विमाननगर - आजीकडे जात असताना अचानक बुलेट घसरून तो कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा "ब्रेनडेड" झाला. अशा परिस्थितीत त्याचे इतर अवयव हे एखाद्या गरजू रूग्णाचा जीव वाचवू शकतात याची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्यांनीदेखील आपला तरूण मुलगा गेला आहे याचे दुःख पचवत त्याचे पाच अवयव दान केले. विश्रांतवाडी येथील भीमनगर येथे राहणाऱ्या मयूर शहाजी मातंग (वय 23) याचा 15 सप्टेंबर रोजी कॉमर्स झोन चौकात बुलेट घसरून अपघात झाला. भीमनगर येथून मेंटल कॉर्नर येथे आजीच्या घरी जात असताना हा गंभीर अपघात झाला. येरवडा पोलिसांनी अपघाताची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. रूग्णालयात दाखल केल्यावर त्याला मेंदूला जबर मार लागल्याने तो ब्रेनडेड झाला होता. मात्र त्याचे इतर अवयव हे गरजू रूग्णांसाठी उपयोगाचे होते. नगररोड येथील सह्याद्री रूग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याच्या पालकांना अवयवदानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. अवयवदानानंतर आपला मुलगा एखाद्याला जीवदान देऊ शकतो, हे समजल्यानंतर त्याच्या पालकांच्या संमतीने त्याचे हदय, यकृत, स्वादुपिंड व दोन किडण्या असे पाच अवयव दान करण्यात आले. विशेष म्हणजे मयूरचे कुटुंब अतिशय गरीब आहे. तो आई, वडील व तीन भावडांसह भीमनगर येथे वास्तव्यास होता. मजुरी करून जीवनाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या सर्वसामान्य कुटुंबाने आपल्या तरूण मुलाचे अवयव दान करून एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या बाबत सह्याद्री रूग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ. सचिन महाजन म्हणाले, मयूर मातंग या तरूण अपघातात डोक्याला गंभीर दुखापतीमुळे उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांच्या मेंदूला मोठी इजा झाल्यामुळे तो ब्रेनडेड झाला होता. अशा परिस्थितीत रूग्णाचा मेंदू पूर्णपणे निकामी (मृत) झाला होता. मात्र त्याच्या शरीरातील इतर अवयव हे सुस्थितीत व इतर गरजूंना रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरणार होते. सह्याद्री रूग्णालयातील डॉक्टर व समुपदेशकांनी अवयवदानाचे महत्व पटवून दिल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या संमतीने त्याचे पाच अवयव दान करण्यात आले. या दुर्दैवी अपघातात मयूर जरी गेला असला तरी "तो" त्याने दान केलेल्या अवयवांच्या माध्यमातून जिवंतच राहणार आहे. एका सर्वसामान्य कुटुंबियांने तरूण मुलाचे अवयव दान करून समाजाला एक वेगळा आदर्श दिला आहे.
ब्रेनडेड तरुणाचे अवयव दान; कुटुंबीयांचा स्तुत्य निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 10:59 PM