अविनाश हुंबरे-
सांगवी : कोरोनाच्या काळात कडक लॉकडाऊन मध्ये लग्न समारंभावर नातेवाईकांच्या उपस्थितीसह वेळेचीही मर्यादा आल्याने लग्न संबंधित सर्व छोटे मोठे व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मिरवणुकीत भाडेतत्वावर आणला जाणारा शाही घोडा...मात्र कोरोना काळात मिरवणुकांना परवानगी नाकारली गेल्यामुळे वर्षभरापासून तो दावणीलाच बांधला असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे घोडे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनामुळे आता अगदी साध्या पद्धतीने विवाह पार पडत आहेत. वास्तविक पाहता, विवाह समारंभ म्हटला की मोठा बडेजावपणा असतो. प्रत्येक जण किती मोठे कर्ज झाले तरी चालेल असे म्हणत थाटामाटात लग्न समारंभ पार पाडतात.
नवरदेवाची वरात काढण्यासाठी खास घोडा मागविला जातो. बारामती शहरासह ग्रामीण भागात विवाहसमारंभात मिरवणुकीला घोडा भाड्याने उपलब्ध करून देणारे अनेक व्यावसायिक आहेत. मार्च, एप्रिल, मे व जून हा कालावधी लग्नसराईचा असतो.मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियम घातल्याने अडचणीत भर पडली आहे. तासभर वापरण्यात येणाऱ्या शाही घोड्यासाठी साधारणत: पाच ते सहा हजारापर्यंत भाडे आकारले जात असतात. परंतु यंदा मिरवणूक बंद असल्याने घोडे व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ........
काहींचे तब्बल १० ते १२ घोडे असून जगण्यासाठी घोड्यांना देखील रोजचा चारा आला, कुटुंब उपाशी मरू नये म्हणून दररोज राशन आले, परंतु लग्नसराईला मर्यादा आल्याने उपजीविकेचे साधन असणारा घोडाच वर्षभर एका जागीच उभा असल्याने त्याच्यासह कुटुंब जगविणे मुश्किल झाले असल्याचे घोडे व्यावसायिकांनी सांगितले.यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे.
लग्नसराई, व इतर समारंभ आता होत नसल्याने घोडे व्यावसायिक, फोटोग्राफर, केटर्स,फुलविक्रेते,वाजंत्री, मंगल कार्यालये, मंडप डेकोरेटर्स, अशा व्यावसायिकांना देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे.
..................
एका घोड्याचा दररोज विविध खाद्यासह चाऱ्याचा खर्च दोनशे ते अडीचशे रूपये येतो. त्यातही माझे ८ घोडे दावणीलाच बांधून असल्याने मोठी ओढाताण होतं आहे.तसेच बारामती तालुक्यात घोड्यांना लग्नाचे भाडे मिळणे बंद झाल्याने सामान्य घोडे व्यावसायिक हतबल झाले आहेत.- रणजित भारत खोमणे, घोडे व्यावसायिक, शिरवली, ता. बारामती )