आमच्यात कुटुंबप्रमुखाचा शब्द अखेरचा असतो; कौटुंबिक कलहावर शरद पवारांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 09:27 PM2019-09-27T21:27:27+5:302019-09-27T21:57:37+5:30
राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांनी मोबाईल बंद ठेवल्याने मोठी खळबळ उडाली होती. राजीनाम्यानंतर शरद पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याचे कारण सांगितले.
मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. यामुळे त्यांनी आज अचानक आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अजित पवार यांनी शरद पवारांनाही अंधारात ठेवल्याचे शरद पवारांनी सांगितले. अजितदादांच्या राजीनाम्याचे कारणही पवारांनी सांगितले.
राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांनी मोबाईल बंद ठेवल्याने मोठी खळबळ उडाली होती. राजीनाम्यानंतर शरद पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याचे कारण सांगितले. दरम्यान, शरद पवार हे मुंबईहून पुण्यातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी निघाले होते. यावेळीच अजित पवारांनी राजीनामा दिल्याने शरद पवारांनी पूरग्रस्तांच्या भेटीला अरण्येश्वरला न जाता पुण्यातील मोदीबागेतील राहत्या घरी पत्रकार परिषद आयोजित केली.
यावेळी पवारांनी सांगितले की, अजित पवारांनी माझ्याशी चर्चा न करताच राजीनामा दिला. अजितचा तडकाफडकी निर्णय घेण्याचा स्वभाव मला माहिती आहे. पण त्यांनी आजच मुलांशी चर्चा केली. आमच्यामध्ये कौटुंबिक वाद नाहीत. आमच्या घरामध्ये कुटुंबप्रमुखाचे ऐकण्याचे संस्कार आहेत. आम्ही दर दिवाळीला एकत्र जमून पुढील दिशा ठरवतो. माझे बंधू वारल्यामुळे सध्या मीच मोठा आहे. यामुळे माझा निर्णय हा अंतिम असतो, असा खुलासा शरद पवार यांनी कौटुंबिक कलहाच्या प्रश्नावर केला.
तसेच आमच आता काही राहिलेले नाही पण पुढील पीढीचे आहे. त्यांच्या भविष्याचा दृष्टीने निर्णय घेतो. कुटुंबामध्ये अनेक सदस्य आहेत. काही परदेशातही आहेत. व्यावसायिक आहेत. त्यांच्या बाबतीतले निर्णयही चर्चा करून घेतले जातात. यामुळे माझा निर्णय हा अंतिम असतो, यापुढेही पाळला जाईल, असेही पवार यांनी सांगितले.
कौटुंबिक कलहाचा मुद्दा भाजपाने लोकसभेवेळी जोरदारपणे मांडला होता. अमित शहांपासून चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या घराला कलहाची पार्श्वभुमी असल्याचे म्हटले होते. तसेच अजित दादांचा मुलगा पार्थ पवार यांची उमेदवारीही शरद पवारांना न विचारता घेतल्याची चर्चा होती. यावरून वादाच्या वावड्या उठविल्या जात होत्या. मात्र, रक्षाबंधन-भाऊबीज सारख्या सणांवेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी औक्षण केल्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकलेले आहेत.