पुणे : मणिपूर तिकडं जळतंय आणि आम्ही इथं पुण्यात आहोत. आमचं सर्व कुटुंब तिथं आहे. त्यांच्या चिंतेने रात्रभर झोप लागत नाही. इथं चूक कोणत्या एका समाजाची आहे असे आम्ही मानत नाही, तर दोन्ही समाजाची चूक आहे. हे सगळं थांबायला हवं. पुन्हा त्या भागात शांतता आणि भाईचारा निर्माण व्हावा, अशी भावना पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मणिपुरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तीन महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घातले असते तर इतकी परिस्थिती चिघळली नसती, असेही ते म्हणाले.
गेल्या सत्तर दिवसांपासून मणिपूरमध्ये संघर्ष पेटला आहे. तिथली परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. मैतई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आल्यानंतर राज्यात हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. नुकताच दोन महिलांचा नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ शहरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने पुण्यात शिक्षण घेत असलेल्या काही मणिपुरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मैतई आणि कुकी समाजात अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची जाणीव कुणालाच नव्हती. अचानक महिलांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
''समाजात अनेकदा गैरसमजुती निर्माण केल्या जातात. आगीत तेल टाकण्याचे काम केले जाते. त्यामुळे दंगली घडतात. सध्या मणिपूरमध्ये जे चालू आहे ते मैतई आणि कुकी समाजामधले वाद आहेत. आमचे कुटुंब त्या भागात राहते. त्यामुळे भीती वाटते. महिलांची नग्न धिंड काढल्याचे कृत्य अतिशय चुकीचे आहे, पण यात चूक दोन्ही समाजाची आहे. एका घटनेमुळे संपूर्ण मैतई समाजाला दोष देणे चुकीचे आहे. मणिपूरमध्ये शांतता नांदावी हीच आमची इच्छा आहे. - मलेन, मणिपुरी विद्यार्थी.''
''सुरुवातीपासूनच मणिपूर राज्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. आत्ता सुरू असलेली परिस्थिती खूप भीतीदायक आहे. मी मणिपूरची रहिवासी आहे. त्यामुळे तिथे सुरू असलेल्या एकंदर घडामोडीबद्दल खूप वाईट वाटते. मणिपूरचा प्रश्न कोणत्या धर्माशी संबंधित नसून मानवतेशी आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी स्वत:चा फायदा सोडून लोकांचा विचार केला पाहिजे. मणिपूरची परिस्थिती लवकर सुधारेल, अशी आशा आम्ही घरातील सगळेच लोक करत आहोत. - सोनिका युमनाम, मणिपूर विद्यार्थिनी.''