युगंधर ताजणे- पुणे : जर पोलिसांत असतो तर मलाही बंदोबस्ताचे काम करावेच लागले असते. तेव्हा कुणीही घरी बसून दिले नसते. सध्याच्या परिस्थितीत जीवावर उदार होऊन प्रसंगी आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता सहभागी झालेल्या पोलिसांना सहकार्य करणे त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. ते आपल्यासाठी सगळे करत असतील तर आपली काही जबाबदारी आहे की नाही ? असा प्रश्न टिम्बर मार्केट येथे राहणाऱ्या अभय जैन यांना पडला. यातून त्यांना पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी 'आयुर्वेदिक काढा' तयार करण्याची प्रेरणा मिळाली.
भवानी पेठेत गिफ्ट आर्टिकलचे दुकान चालवणाऱ्या अभय जैन यांना पोलिसांना आयुर्वेदिक काढा तयार करण्याची कल्पना सुचली. त्यांनी ती तातडीने अंमलात देखील आणली.२३ मार्च पासून त्यांनी काढा वाटपास सुरुवात केली. कदाचित लॉकडाऊन वाढल्यास काढ्याचे वितरण सुरू ठेवणार असल्याचे ते सांगतात. या कामात त्यांना त्यांचे वडील चूनीलाल जैन, आई शांती जैन आणि पत्नी अमिता जैन यांचे सहकार्य लाभले. स्वत:चा जीव धोक्यात घालून नको ते उद्योग कशाला करतोस असा प्रश्न अनेकांनी जैन यांना केला. मात्र ते यावर सगळ्यांना आपल्या सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या पोलिसांकरिता काही करायला हवे ही इच्छा स्वस्थ बसू देईना. त्यातून त्यांनी काढा वाटपास सुरुवात केली. पूर्ण शहरातील पोलीस ठाणे, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना त्यांनी काढा देण्यास सुरुवात केली. टिळक रस्ता, फरासखाना, खडक पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय, बंडगार्डन तसेच वानवडी, हडपसर याठिकाणी बंदोबस्तात असणा?्या पोलिसांना काढ्याचे कप दिले जात आहे. सुरुवातीला त्यांना यात अडचणी आल्या. कुणी हा काढा घ्यायला तयार होईना. अनेकांनी काढा घेण्यास नकार दिला. मात्र जैन यांनी हार न मानता त्याचे वाटप सुरू ठेवले. आता काढा यायला थोडा उशीर झाला तर पोलीस त्यांना स्वत:हून फोन करून काढा घेऊन या. असा निरोप पाठवतात.
* पहिल्यांदा काढा तयार केल्यानंतर तो एका आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवला. त्यांनी तो चांगला असल्याचे सांगितले. मग तो वितरित करण्याचा निर्णय घेतला. काढा वाटपासाठी एकटा घरातून बाहेर पडतो. त्यासाठी योग्य ती काळजी घेतो. मास्क घालणे, सॅनिटाईजर जवळ बाळगणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे यासर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. आपल्या थोड्याशा मदतीने जर पोलिसांना ऊर्जा आणि त्यांचे मनोबल वाढणार असेल तर ते काम आनंदाने करायला हवे. ही या मागील भूमिका आहे. - अभय जैन (काढा वाटप करणारे)
* काढ्यात आहे तरी काय ? आले, काळेमिरी, काळे मीठ, लवंग, दालचिनी, वेलची, लिंबू, आंबे हळद, पुदिनाची पाने, तुळशीचे पाने, ओवा, हिंग ही सर्व सामग्री मिळून आयुर्वेदिक काढा तयार केला जातो. या सर्व सामग्रीला एका मोठ्या भांड्यात अर्धा ते पाऊण तास उकळले जाते. जे साहित्य यात वापरले आहे त्याचा अर्क पाण्यात पूर्णपणे उतरण्यासाठी ते सतत ढवळले जाते. त्यानंतर ते एका मोठ्या थर्मास मध्ये गाळून भरले जाते. काढ्यासाठी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी वापरले जाते.
* वाटप कसे होते ? एका वेळी साधारण 60 ते 65 लिटर काढा तयार होतो. यात एकूण 1200 कपचे काढा वितरण करता येते. एका ट्रिप मधून 12 लिटर काढा वाटपासाठी नेता येतो. पोलीस कर्मचा?्यांना दररोज 150 मिली काढयाची गरज आहे. एक कपमधून त्यांना 60 मिली काढा मिळतो. दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत काढा वितरित करण्यात येतो. तसेच रात्री अकरा ते पहाटे दोन या वेळेत देखील पोलिसांना काढा देत असल्याचे जैन यांनी सांगितले.