लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : गेल्या वर्षभरात शहरात महिला-मुलींची सुरक्षितता, रोडरोमियोंचा उन्माद आदी विषयांवर लक्ष केंद्रित करून चांगले काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची पदोन्नतीवर बदली झाली. त्यांच्या जागी राजेंद्र कुंटे यांनी पदभार घेतला असून, या प्रश्नांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शिरूर शहराची लोकसंख्या, नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. अशात शहराची कायदा, सुव्यवस्था सुरळीत राबवणे हे पोलिसांसमोर आव्हान बनत आहे. एक वर्षापूर्वी दयानंद गावडे पोलीस ठाण्यात रुजू झालेगेल्या वर्षभरात गावडेंनी चांगला दरारा निर्माण केला. त्यांची स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागात बदली झाली. या बदलीमुळे गावडे खूष झाले. मात्र शिरूरकरांनी नाराजी व्यक्त केली.आता नवीन अधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहेत. चार वर्षांपूर्वी शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या नारायण सारंगकर यांनीही शहरात कमालीचा दरारा निर्माण केला होता. त्यांचा वचक तर गावडेंपेक्षाही जास्त होता. मात्र त्यांचीही सहा महिन्यांत बदली झाली. अशाच अधिकाऱ्यांची सध्या शहराला गरज आहे. यामुळे कुंटे यांच्यासमोर गावडे व सारंगकर यांच्याप्रमाणे कामाची अपेक्षा शिरूरकरांना आहे. हे आव्हान ते कसे पेलतात, हे दिसेलच. अर्थात प्रत्येक अधिकाऱ्याची कामाची पद्धत वेगळी असते, तरीही नागरिकांना शहरात कायदा, सुव्यवस्था सुरळीत असावा, अशी अपेक्षा असतेच. शहरातील रस्त्यांवर सतत होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी गावडे यांनी वाहतूक समिती स्थापन केली. कुंटे यांनी ही समिती कार्यरत ठेवून ही समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. कुंटे यांनी महिला सुरक्षितता रोडरोमियोंचा बंदोबस्त याकडे गांभिर्याने लक्ष देण्याचे सुतोवाच केले आहे. गुंडगिरी मोडून काढण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तालुकास्तरावर जसा सजग नागरिकांचा पीएस १०० असा ग्रुप आहे, तसा प्रत्येक बीटनिहाय ग्रुप तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गरीब मुलामुलींना मदत देण्याबरोबरच सर्व जातीधर्माच्या महापुरुषांची तसेच चांगली वाचनीय पुस्तके ठेवून ग्रंथालय उभारण्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत.
सुरक्षितता, रोडरोमियोंवर वचक ही कुंटेंसमोरची आव्हाने
By admin | Published: May 31, 2017 1:28 AM