लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीपासून अलिप्त होण्यासाठी घटस्फोटाचा दावा जातपंचायतीऐवजी न्यायालयात दाखल केल्याने मुलाच्या कुटुंबीयांना पावणेतीन वर्षांपासून जातपंचायतीच्या हुकुमावरून समाजातून बहिष्कृत केल्याची घटना वाकडमध्ये घडली. याप्रकरणी जातपंचायतीचे पाटील, पंच यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने गुरुवारी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र अंनिसच्या कायदे विभागातील अॅड. मनीषा महाजन, प्रकाशन विभागाचे विशाल विमल यांच्यासह पीडित सीताराम सागरे यांच्यासह त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. सीताराम सागरे यांनी जातपंचायतीकडून देण्यात आलेल्या त्रासाचा अनुभव कथन केला. ते म्हणाले, पत्नी शीतल हिचे आई वडील, आजोबा करेप्पा मारुती वाघमारे, मामा बाजीराव करेप्पा वाघमारे, साहेबराव करेप्पा वाघमारे आणि बाळकृष्ण करेप्पा वाघमारे हे जातपंचायतीचे पाटील म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या पुढाकारानेच आमच्या कुटुंबीयांना बहिष्कृत करण्यात आले आहे. आमचा वाद आम्ही मिटवला असता. मात्र तिने विनाकारण तिच्या कुटुंबीयांना मध्यस्थी करण्यास भाग पाडले. सागरे कुटुंबीयांशी कुणी संबंध ठेवल्यास त्यांनाही वाळीत टाकू, असे फर्मान जातपंचायतीने काढले आहे. आम्ही हिंदू गोंधळी समाजाचे असून, ५२ गावांत जातपंचायत चालते. सर्वप्रकारचे कौटुंबिक वाद हे पंचायतीत सोडवले जातात. आमच्या समाजातील मुलींना शिकविले जात नाही. त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे.
महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकारामुळे राज्यातील १७ जातपंचायती बरखास्त
महाराष्ट्र अंनिसच्या पाठपुराव्यामुळे ३ जुलै २०१७ रोजी राज्यात सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा झाला. ४ वर्षांत या कायद्यांतर्गत १५० गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात कोकण वगळता जिल्ह्यात सर्वाधिक १५ गुन्हे दाखल झाले आहेत. अंनिसच्या संवादी भूमिका आणि पुढाकारामुळे राज्यातील १७ जातपंचायती बरखास्त झाल्या आहेत. सागरे कुटुंबीयांशी जातपंचायतीच्या हुकुमावरून अमानवीय वर्तन घडले आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास जलगतीने व्हावा आणि या जातपंचायतीमुळे अन्य कुणी पीडित झाले असेल तर त्यांनीही तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन अॅड. मनीषा महाजन आणि विशाल विमल यांनी केले आहे.
----------------------------------------------------------------