पुणेः प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या बंगल्यात घरफोडी करण्यासाठी शिरलेल्या चोरट्याला नागरिक व पोलिसांनी पकडले.
अजय मल्हारी खरात (वय २०, रा. पदमावती) असे अटक केलेल्याचे नव आहे.
याप्रकरणी खेडकर यांचा नातू संजय विश्वनाथ ओव्हाळे (वय ५०, रा. धनकवडी) यांनी मार्केटयाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओव्हाळ यांचे आजोबा व प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांचा मार्केटयार्ड येथील प्रेमनगर सोसायटीमध्ये शिल्पकला या नावाचा बंगला आहे. त्यांचे निधन झाल्याने सध्या या बंगल्यात कोणी रहात नाही. खरात हेच अधून मधून बंगल्यात जाऊन पाहणी करतात. बंगल्याच्या खालच्या मजल्यावर एक डॉक्टर भाड्याने राहतात. २४ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना भाडेकरु डाॅक्टरांचा ओव्हाळे यांना फोन आला. वरजच्या मजल्यावर कोणीतरी व्यक्ती शिरला असून त्याचा आवाज येतो आहे. चोर शिरल्याचा संशय आल्याने ओव्हाळे यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली व त्यांनी आजोबांच्या बंगल्याकडे धाव घेतली.
सहायक पोलीस निरीक्षक पी. ए. खटके, पोलीस उपनिरीक्षक एस. पी. शिंदे व दोन पोलीस घटनास्थळी पोहचले. बंगल्याशेजारी राहणारे व त्यांचे नातेवाईकही त्या ठिकाणी आले. पोलीस व ओव्हाळे यांनी पाहणी केली. तेव्हा त्यांना चोरटा हा गॅलरीची खिडकी उघडून आत शिरल्याचे आढळून आले. काही वेळात आणखी पोलीस कुमक आली. काही पोलीस बंगल्याच्या मुख्य दरवाजात त काही गॅलरीजवळ थांबले. काही जणांनी आत जाऊन एका तरुणाला पकडून आणले. त्याच्याकडे काहीही मौल्यवान वस्तू आढळून आल्या नाहीत. बंगल्यातील काही वस्तू चोरीला गेल्या नसल्याचे दिसून आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखाने यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अजय खरात याला पोलिसांनी अटक केली.