पुणे : प्रसिद्ध शीळवादक आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन आत्माराम ऊर्फ आप्पा कुलकर्णी (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी मेधा, मुलगा अमित आणि मुलगी क्षिप्रा असा परिवार आहे. कुलकर्णी यांच्या अंतिम इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले.
नाट्यसंगीत आणि चित्रपटगीते शीळवादनातून सादर करण्यामध्ये कुलकर्णी यांचे उत्तम प्रभुत्व होते. त्यांची नाट्यसंगीताच्या शीळवादनाची सीडी प्रकाशित झाली होती. ‘इंडियन व्हिसलर्स असोसिएशन’च्या माध्यमातून देशभरातील विविध शीळवादकांनी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीताच्या केलेल्या सादरीकरणात आप्पा कुलकर्णी यांचाही सहभाग होता. ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते. ‘बँक आॅफ महाराष्ट्र’मध्ये कामाला असताना कुलकर्णी यांनी रक्तदात्यांची सूची केली होती. कोणालाही रक्ताची गरज लागल्यास ते रक्तपेढीतून रक्त मिळवून देत असत किंवा रक्तदाता शोधून देत असत. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या ‘तोच मी’ या आत्मचरित्राचे लेखन कुलकर्णी यांनी केले होते. ‘वैकुंठ परिवार’च्या माध्यमातून प्रत्येक वर्षी दिवाळीला वैकुंठ स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना फराळ आणि भेटवस्तू देण्यासाठी ते पुढाकार घेत असत. ते उत्तम कशिदा कारागिरी करणारे कलाकार होते.
..........................