चेन्नई सुपर किंग या आयपीएल संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहत्यांनी भरलेली विसल पोडू एक्सप्रेस ' पुण्यात पोचली आहे. विसल पोडू एक्सप्रेस नावाचा चाहत्यांचा गट चेन्नईच्या संघाचा नेहमीच पाठिंबा देत असतो. चेन्नईच्या संघाचे सामने जिथे होतील तिथे जाण्यासाठी हे चाहते तयार असतात. आज पुण्यात चेन्नईची लढत राजस्थान रॉयल्स विरोधात होत असून त्यासाठी पुणे स्टेशनवर शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास चेन्नईच्या चाहत्यांचे आगमन झाले.
सुमारे ७०० चाहते या ट्रेनमधून तब्ब्ल २८ तासांचा प्रवास करून पुण्यात आले आहेत. कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून झालेला वाद हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ससंघाला चांगलाच भोवला आहे. या वादामुळे त्यांना आपल्या घरच्या मैदानातील सामन्यांना मुकावे लागले आणि हे सामने पुण्याला हलवण्यात आले. पण आपल्या चाहत्यांना ने-आण करण्याची व्यवस्था संघ व्यवस्थापनातर्फे करण्यात आली आहे.
शुक्रवारी पुणे स्टेशनवर चेन्नई संघाचे पिवळ्या रंगांचे टी-शर्ट घातलेले चाहते मोठे जल्लोषात उतरले. त्यांचा उत्साह आणि मोठी संख्या बघून अनेक पुणेकरांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी सोडली नाही. आम्ही चेन्नईहून मॅच बघण्यासाठी आलेलो आहोत. आजच्या मॅचसाठी प्रचंड उत्सुक आहोत आणि धोनी आमचा आवडता खेळाडू असल्याची माहिती एका चाहत्याने दिली. सुरुवातीला सामने पुण्यात शिफ्ट झाल्याने आम्ही खूप निराश झालो होतो पण आता पुण्यापर्यंत आम्हाला पोचवण्याची व्यवस्था केल्याबद्दल आम्ही चेन्नई संघ व्यवस्थापनाचे आम्ही आभारी आहोत अशीही प्रतिक्रिया चाहत्याने दिली. पुण्यातील सर्व सामने जिंकणार असल्याचा विश्वासही चाहत्यांनी व्यक्त केला आहे.