पुणे : शहरात १३ ते १७ डिसेंबर या कालावधीत आयोजित ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी १६ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे रसिकांना मध्यरात्रीपर्यंत संगीत मैफिलीचा आस्वाद घेता येणार आहे.
पुणे जिल्ह्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास सवलतीचे १५ दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी १४ दिवस सवलत देण्यात आली असून शिल्लक राहिलेला १ दिवस आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या विनंतीवरून १६ डिसेंबर रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा. ध्वनीचे शोषण करणारे विशिष्ट लाकडी सामुग्री आवश्यक त्या ठिकाणी लावावी. क्षेत्राप्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेऊ नये तसेच शांतता क्षेत्रात ही सूट लागू नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.