पुणे : वि.वा. शिरवाडकर यांचे अजरामर नाटक ययाती आणि देवयानी आता इंग्रजी भाषेतून उपलब्ध होणार आहे. संगीत नाटका बरोबरच यातल्या गाण्यांचा आता इंग्रजी मधून आस्वाद घेता येणार आहे. पुण्यातला आयटी क्षेत्रातील अभियंता निनाद जाधव याने हे भाषांतर केले आहे.
मराठी साहित्यातील अजरामर कलाकृती असणारं ययाती आणि देवयानी हे नाटक. अमराठी लोकांपर्यत हे नाटक पोहोचाव या हेतूने आता हे नाटक इंग्रजी मध्ये करण्यात आले आहे. पुण्यातील तरुण निनाद जाधव या अभियंता तरुणाने अनेक मराठी संगीत नाटकात काम केले आहे. ययाती आणि देवयानी नाटकात त्यांनी देवयानी ची भूमिका साकारली. त्यानंतर जाधव यांनी हे भाषांतर केले आहे.
निनाद जाधव 'लोकमत' शी बोलताना म्हणाले " यामध्ये गद्य आणि पद्य दोन्हीचे भाषांतर केले आहे. तात्यासाहेब शिरवाडकरांच्या भाषेचे आणि काव्याचे सौंदर्य अपूर्व आहे. त्यामुळे अर्थात भाषांतर करणे फार आव्हानात्मक होते. मार्च २०२० मध्ये हे भाषांतर सुरू केले. ते यंदाच्या फेब्रुवारीपर्यंत सुरू होते.भाषांतर काळजीपूर्वक तपासून घेतले. त्यानंतर हे प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला ."
महत्वाचे म्हणजे फक्त भाषांतर नाही तर या नाटकाचा इंग्रजी मधून प्रयोग करण्याचा ही जाधव प्रयत्न करणार आहेत. त्याबरोबरच हे भाषांतर नाटकाविषयी अभ्यास करणाऱ्या विद्यापीठ आणि संस्थांना ही कॉपी पाठवण्यात येणार आहे.