काश्मीरचा तुम्हाला उपयोग काय?
पुणे नगर वाचन मंदिराचा मी विश्वस्त होतो. सामाजिक आणि राजकीय कामामुळे अशा नियुक्त्या होत असतात. त्या सर्वांमध्ये बहुधा मीच सर्वाधिक तरुण असेल. बाकी सगळे जुन्या पुण्यातील ‘खट’ लोक. तिथे इमारतीच्या खालच्या चौकात बऱ्याच चर्चा चालत. एकदा अशीच भारत-पाकिस्तान संबंधांवर काश्मीरच्या अनुषंगाने चर्चा सुरू होती. सगळेच कळकळीने बोलत होते. पाकिस्तान कसा त्रासदायक आहे, त्यामुळे भारताला कसा संरक्षणावर खर्च करावा लागतो, अंतर्गत अशांतता कशी वाढत आहे असे बरेच मुद्दे येत होते. शनिवार, नारायण पेठकरी, ‘एकदा हे सगळे संपवायलाच हवं’ म्हणून जोर देत होते, तर बाकीचे काहीजण ‘भारत कसा शांततापूर्ण मार्गाने यावर उपाय काढत आहे’ असे सांगत होते. वाढता वाढता ही चर्चा फारच वाढली. सगळेच वयस्कर, एकेकाचा आवाज हळूहळू चढू लागला व नंतर तर तो तारस्वरात पोहोचला. पुण्यातीलच जुन्या पिढीतील एक प्रसिद्ध लेखकही त्यात होते. ते अचानक उठले. ते असे उठून ऊभे राहिल्यावर गलका एकदम शांत झाला. ‘देऊन टाका रे ते काश्मीर एकदाचे पाकिस्तानला, सगळी कटकट मिटून जाईल. केवढा खर्च चाललाय, सैनिक मरताहेत’ वगैरे बोलून झाल्यावर त्यांनी ‘नाहीतरी तुम्हा सर्वांना आता काश्मीरचा उपयोग काय?’ असे म्हटले आणि तिथे हशा पिकला. त्यांच्या या पुणेरी विनोदबुद्धीने सगळा तणाव एकदम हलका झाला.
महापौराचा झालो इन्स्पेक्टर
महापौर झाल्यावर त्याच दिवशी पुण्यातल्या प्रथेप्रमाणे शहरातील सर्व थोर व्यक्तींच्या पुतळ्याला हार घालावेच लागतात. मलाही ते करावेच लागले. त्याशिवाय गल्लीत, इकडे तिकडे सत्कारच सत्कार. दिवसभरच्या दगदगीने मी वैतागून गेलो होतो. त्यावेळी बालगंधर्वचा कट्टा हे माझे आवडते ठिकाण. मग तिथे गेलो. बसलो. गप्पा झाल्या. रात्री अभिनेते राजा गोसावी यांच्या सौजन्याची ऐशीतैशी नाटकाचा प्रयोग असल्याचे समजले. त्यांची माझी चांगली ओळख होती. आतमध्ये ते आल्याचे समजले म्हणून म्हटले, भेट घ्यावी. गेलो. भेटलो. एकदम भन्नाट माणूस. ‘काय करता आहात आज?’असे त्यांनी विचारले. म्हटलं, ‘दमलोय हो खूप राजाभाऊ!’ मग आपण एक काम करू म्हणाले. तुमचा सगळा शीण घालवतो असे सांगून त्यांनी त्यादिवशी मला त्यांच्या नाटकात चक्क एका इन्स्पेक्टरचा रोल करायला लावला. महापौर झाल्यावर नाटकात काम करणारा मी पहिलाच महापौर ठरलो.
- गप्पाजीराव