पुणे : बॉम्बस्फोट झाल्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवाराला किल्ल्याचे स्वरूप आले असून बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणासमोर पोलिसांनी एक शेड उभारले आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद ठेवली जात आहे. बॅरिकेड्स लावून पोलीस ठाण्याच्या भोवती सुरक्षेचे कडे करण्यात आले आहे. जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असलेले पोलीस नागरिकांपेक्षा स्वत:च्या सुरक्षेबाबत अधिक गंभीर असल्याचे चित्र सध्या फरासखान्याच्या आवारात दिसत आहे. पोलीसच चौकी पहाऱ्यांच्या आतमध्ये बसले तर नागरिकांशी त्यांची नाळ कशी जोडली जाणार, हा प्रश्न आहे.गुरुवारी, १० जुलै रोजी दुपारी २.०५ वाजता दगडूशेठ गणपती मंदिराच्या अगदी जवळ आणि फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. फरासखाना पोलीस ठाण्याच्या इमारतीत अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग), उपायुक्त, २ सहायक आयुक्त, दोन्ही पोलीस ठाण्यांचे चार पोलीस निरीक्षक यांच्यासह सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी असतात. यासोबतच विश्रामबाग आणि फरासखाना वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारीही याच इमारतीत बसतात. पोलिसांचा एवढा मोठा राबता या इमारतीत असतानाही या ठिकाणी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना होती.बॉम्बस्फोटाचा तपास आपोआपच एटीएसकडे गेल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरीही त्यांची जबाबदारीतून मुक्तता झालेली नाही. शहरात आतापर्यंत तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१३ रोजी इंडियन मुजाहिदीनच्या यासिन भटकळने बॉम्ब ठेवला, तर कतिल सिद्दीकी हा दगडूशेठ मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्यात अयशस्वी ठरला होता. जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटात १७ जणांना प्राण गमवावे लागले होते, तेव्हापासून दगडूशेठ मंदिराला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा सातत्याने दिला होता; परंतु पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची ठोस खबरदारी घेण्यात आली नाही़ दहशतवाद्यांनी दगडूशेठ मंदिर आणि पोलीस यांना एकत्र ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न करीत पोलीस ठाण्याच्या आवारातच बॉम्बस्फोट घडवून आणला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. दगडूशेठ मंदिराभोवती ट्रस्टच्या सुरक्षारक्षकांसह हत्यारबंद पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांचा खडा पहारा असतो. मंदिराच्या डाव्या हाताला कायम पोलिसांची ‘वज्र’ उभी असते. ती सध्याही आहेच. यासोबतच स्फोटांनंतर पोलीस ठाण्याच्या सुरक्षेची जाणीव झालेल्या पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या आवारात वाहने लावायला बंदी केली आहे. बॅरिकेड्स लावून आवार मोकळे केले आहे. आतमध्ये केवळ अधिकाऱ्यांचीच वाहने लावली जात आहेत. पोलीस ठाण्यासमोर ‘नो पार्किंग’ केलेल्या जागेत पोलिसांची वाहने मात्र भर रस्त्यावर राजरोसपणे आणि तीही ‘नो पार्किंग’च्या फलकासमोरच लावली जात आहेत. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, त्या जागेच्या समोरच पोलिसांनी छोटेखानी ‘चेकपोस्ट’ उभारले आहे. या टपरीवजा शेडमध्ये दोन पोलीस कर्मचारी तैनात असतात. त्याचबरोबर इमारतीच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसविण्यात आला आहे़ सर्वसामान्यांना या पहारेदारांच्या तपासणीतूनच आतमध्ये जावे लागत आहे, त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवाराला सध्या किल्ल्याचे स्वरूप आले आहे; परंतु दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून ज्यांचा जीव घेतात त्या नागरिकांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना मात्र तेवढ्या तत्परतेने आणि काळजीने केल्या जातात का, हाच खरा प्रश्न आहे.(प्रतिनिधी)
फरासखाना ठाणे ‘तटबंदी किल्ला’
By admin | Published: July 28, 2014 4:47 AM