भोर : स्वारगेट-भोर मार्गावरील करण्यात आलेली भाडेवाढ अन्यायकारक आहे. याचा फटका प्रवासी नागरिकांना बसत आहे. त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. झालेली भाडेवाढ त्वरित रद्द करावी, म्हणून आमदार संग्राम थोपटे यांनी विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना निवेदन दिले आहे.भोर-स्वारगेट या मार्गावरील कात्रजमार्गे जाणाऱ्या सर्व एसटीच्या फेऱ्या शिंदेवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील पुलाच्या कामामुळे तूर्त शिंदेवाडी येथील नवीन बोगदा नवले पुलामार्गे कात्रज, भापकर पंप, लक्ष्मी-नारायणमार्गे स्वारगेट अशा पद्धतीने चलनात आहे. मात्र, या मार्गावर दोन टप्प्यात वाढ करण्यात येऊन प्रतिप्रवासी १२ रुपयांप्रमाणे अन्यायकारक भाडेवाढ करण्यात आली आहे. नियमाप्रमाणे या मार्गावर ५१ रुपये भाडे आकारले पाहिजे. प्रत्यक्षात मात्र ६३ रुपयांप्रमाणे भाडे आकारले जाते. त्याचप्रमाणे स्वारगेट-भोर या एसटीच्या मार्गावर राष्ट्रीय महामार्गावरील कापूरव्होळ गावाजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असून तेथेही एसटीने एक टप्पा वाढवून प्रतिप्रवासी ६ रुपयांप्रमाणे ५७ रुपये भाडे आकारले जात आहे. प्रत्यक्षात ५१ रुपये भाडे आकारले पाहिजे. ही भाडेवाढ फक्त भोर आगारातून येणाऱ्या व जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांनाच लागू केली आहे. अन्य आगारातून येणाऱ्या गाड्यांना भाडेवाढ आकारली जात नाही. मग भोरच्या प्रवाशांवरच अन्याय का? यामुळे प्रवासी त्रस्त झाले असून भाडेवाढ रद्द झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
एसटी प्रवाशांना भाडेवाढीचा फटका
By admin | Published: November 10, 2015 1:35 AM