बारामती : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण प्रश्नी मागील ८ दिवसांपासून बारामतीत सुरू असलेले उपोषण आंदोलन मागे घेण्यासाठी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची शिष्टाई कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे निष्फळ ठरली. प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी शिष्टाई केली. परंतु, उपोषणकर्ते व आंदोलकांनी ठाम भूमिका घेतली. दि. १५ ते २१ जुलै पंढरपूर ते बारामती अशी आरक्षण दिंडी काढण्यात आली. २१ तारखेला बारामतीत आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी मेळावा झाला. त्यानंतर अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा निर्णय झाला. याच वेळी १६ जणांनी उपोषण आंदोलन सुरू केले. आज ८व्या दिवशीदेखील आंदोलन सुरू होते. शनिवारी रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री, अधिकाऱ्यांसह मुंबईत झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नव्हता. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमधील संताप वाढला. कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आज ८व्या दिवशी प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या सभागृहात आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सुळ, बाळासाहेब गावडे, मदनराव देवकाते, विश्वासराव देवकाते यांच्यासह अन्य २३ सदस्यांबरोबर ३ तास चर्चा केली. या चर्चेत उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे. त्याचबरोबर त्यांना शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. आंदोलन हिंसक होण्याच्या मार्गावर आहे. मागील दोन दिवसांत आंदोलन भरकटत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी समितीच्या सदस्यांना सांगितले. तरुण कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळेच प्रशासनदेखील सर्तक आहे. त्यातून समन्वय साधून उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी भूमिका असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
धनगर आरक्षणप्रश्नी शिष्टाई निष्फळ
By admin | Published: July 29, 2014 3:43 AM