बारामती (पुणे) :बारामती शहरात शुक्रवारी पावसाच्या सरींमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पडली. मिरवणुकीत यंदा विविध सजावटीचे देखावे साकारत गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. शहरात यंदाही बहुतांश तरुण मंडळांनी गुलालविरहित मिरवणुकीची परंपरा कायम राखण्याचे चित्र होते.
शहरात सकाळपासूनच गणपती विसर्जनासाठी वाजत-गाजत अनेक लहान मंडळे तसेच घरगुती गणपतीचे ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...‘ च्या जयघोषात विसर्जन सुरू होते. शहरातील नटराज नाट्य कला मंडळाच्या गणरायाची फुलांनी सजवलेल्या पालखीतून, टाळ-मृदंगाच्या गजरासह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी फेट्यासह पारंपरिक वेशभुषा केली होती. शहरात नगरपरिषदेने तयार केलेल्या जलकुंडात गणरायांचे विसर्जन करण्यात आले.
सायंकाळी शहरातील अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाच्या श्रीमंत आबा गणपतीची रथातून काढलेली मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गणरायाची आरती सुभाष सोमाणी, श्याम इंगळे, योगेश चिंचकर, करण वाघोलीकर, सुनील लडकत, रमेश पंजाबी, प्रकाश पळसे, रामलाल रायका आदींच्या हस्ते करण्यात आली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, जनहित प्रतिष्ठानच्या ढोल पथकाने मिरवणूकीत रंगत आणली. घोडे, उंट, तुतारी आणि हलगी ग्रूपमध्ये मिरवणूक अधिकच रंगली. मंडळांच्या महिलांची यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. पालिकेच्या कुंडात मुतीर्चे विसर्जन करण्यात आले.
बारामतीकरांचे श्रद्धास्थान मानाचा पहिला श्री मंडई गणपती विसर्जन मिरवणूक सोहळ्यास शुक्रवारी सकाळी ११ वाजता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र धालपे, अण्णा आटोळे, उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश धालपे, मंगेश पवार, समीर ढोले, अशिष घोरपडे, सोमनाथ धनराळे, चेतन वाडेकर, ऋषीकेश राऊत, अनमोल राऊत, चेतन घुमरे, विनीत बहादूरकर अनिकेत धालपे, सुधीर वाडेकर आदींच्या हस्ते सुरुवात झाली. मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने यंदा नेत्रदिपक मिरवणूक मंडळाने काढण्यात आली.
श्री. शिवछत्रपती प्रतिष्ठानचे वाद्य पथक व जयस्तुते वाद्य पथक सहभागी झाले होते. तीस फूट उंचीच्या, झुंबर आणि आकर्षक फुलाची सजावट केलेल्या मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये सुंदर विद्युत रोषणाई करत आतमध्ये मुर्ती विराजमान करण्यात आली होती. सनई वादन, घोडेस्वार, तुतारीवाले हे मिरवणूकीचे आकर्षण ठरले. रात्री दोन वाजता १५ तासानंतर ही मिरवणूक संपली.
बारामती नगरपरिषदेकडून शहरात ४० ठिकाणी जलकुंडासह निर्माल्य जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जलकुंडात ३४१९ गणेश मुर्तींचे संकलन करण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य संकलन करण्यात आले. शहर पोलीसांच्या हद्दीत यंदा ७२ गणेशोत्सव मंडळांनी गणेश मुर्तीची स्थापना केली होती. मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत येथे थांबत पर्यावरणपुरक गणेश विसर्जनासाठी नागरिकांना आवाहन केले. परिणामी यंदा कालवा, विहिरीत मुर्ती विसर्जनाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.
गुलालाचा वापर टाळुन गुलाबाच्या पाकळ्यांचा मिरवणुकींवर कार्यकर्त्यांनी वर्षाव केला. विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडींक आणि पोलिस विभागाने मोठा बंदोबस्त ठेवला होता.