पुणे : मराठवाड्यातील भीषण दुष्काळास हवामान खात्याचे चुकीचे अंदाज जबाबदार असल्याचा आरोप करत माजलगाव येथील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हवामान खात्याला टाळे ठोकण्यात आले. तसेच ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी हवामान खात्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
हवामान खात्याने मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. परंतु मराठवाड्यात पाऊस न झाल्याने पिकं करपली त्यामुळे करोडो रुपये हवामान खात्यावर खर्च करण्यापेक्षा हे खातं बंद करा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. हातात करपलेली पिकं घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.
यावेळी बोलताना शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई गंगाभीषण थावरे म्हणाले, हवामान खात्याने सांगितलेले अंदाज अनेकदा चुकीचे ठरले आहेत. यंदा मराठवाड्यात चांगला पाऊस होईल असे सांगितले होते, प्रत्यक्षात पाऊस पडलाच नाही. हवामान खात्याच्या अंदाजवरून आम्ही पेरणी केली परंतु पाऊस न पडल्याने आमची सगळी पिकं करपून गेली, त्यामुळे खोट्या बातम्या देणारे हवामान खाते बंद करून टाकायला हवे. आधीचे लोक आकाशाकडे बघून पाऊस पडेल कि नाही हे सांगत होते तेच आम्हाला आता योग्य वाटते.
शेतकरी असलेले, परमेश्वर तौर म्हणाले, यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आल्याने आम्ही पेरणी केली पण पाऊस न पडल्याने आमचे पीक वाया गेले. हवामान खात्याने योग्य अंदाज वर्तवला असता तर आम्ही पेरण्या केल्या नसत्या. हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान पुण्यातील हवामान विभागाच्या कार्यालयाने शेतकऱ्यांना पत्र देत शेतकऱ्यांचे निवेदन दिल्ली कार्यालयाला पाठवले असल्याचे कळवले. तसेच झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.