चाकण : शेतकऱ्यांना वातावरणातील बदल, पीक लागवड, कीड रोगाचे व्यवस्थापन, औषधफवारणी, वादळी वारे आणि पाऊस यांसह शेतीविषयक सगळीच माहिती मिळावी, यासाठी ‘किसान ॲप’ची निर्मिती केली. त्या ॲपच्या आधारे शेतकऱ्यांना मेसेजद्वारे माहिती देण्यात येत होती. मात्र, काही दिवसांपासून नेटवर्कअभावी ही माहिती शेतकऱ्यांना मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे पिकांवर येणाऱ्या संकटावेळी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना शेतीविषयक अचूक माहिती मिळावी, यासाठी शासनाने किसान पोर्टल सुरू केले आहे. खेड तालुक्यात शेतीला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने येथील शेतकरी सधन झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक शेतकरी शेतात विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्य पिके, भात शेती आणि फळबागांमधून चांगले उत्पादन घेत आहेत. अनेक शेतकरी नवनवीन शेती पिकांचे उत्पादन घेऊन सेंद्रिय खतांचा वापर करून पिके घेत आहे. निर्सगाच्या अनियमितपणामुळे अचूक माहिती मिळावी यासाठी किसान पोर्टलला जोडले गेले आहे. परंतु मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने शेतीविषयक माहितीचे एसएमएस मिळत नाही. यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
किसान ॲपमुळे शेतकऱ्यांना शेतीबद्दल चांगल्या प्रकारे माहिती मिळत आहे. बी-बियाणे, खत, औषध आणि हंगामातील पिकांची लागवड, वाढीव उत्पादन याचे व्यवस्थित नियोजन करता येत आहे. परंतु मेसेज वेळेवर मिळत नसल्याने हवामानाचा अंदाज चुकत आहे, असे गोनवडी येथील प्रगतिशील शेतकरी दिनेश मोहिते-पाटील यांनी सांगितले.
आमच्याकडे मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने पावसाची माहिती मिळत नाही. भामनेर खोऱ्यात भाताचे आगर असल्याने सर्व पावसावर अवलंबून असते. अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल नाही. त्यामुळे त्यांना मेसेजवर अवलंबून राहवे लागते. तेही नेटवर्क अभावी मिळत नाही. यावर सरकारने काहीतरी नियोजन करावे, असे भात उत्पादक शेतकरी किसन नवले यांनी म्हटले आहे.