इंदापूर: इंदापूरातील पाच खासगी सावकारांनी व्याजाने दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात शेतकर्याकडून जमीन खरेदी करून घेतली. मुद्दलासह व्याज रक्कम सावकारांना परत दिल्यावर जमीन शेतकर्याला परत करण्याचा वायदा करण्यात आला. त्यानुसार शेतकर्याने सावकाराला पैसे परत करून जमीन नावावर करून देण्याची मागणी केली असता सावकारांनी जमीन परत देण्यास नकार देत कर्जदारालाच दमदाटी व जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याने शेतकर्याने सावकारांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने इंदापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
महादेव दशरथ हराळे (वय ४७) (रा. इंदापूर चांभारगल्ली) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. त्याच्यावर इंदापूर येथील खासगी रूग्णांलयामध्ये उपचार सुरू असुन त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर सुर्यकांत दगडु जाधव (रा.चाळीसफुटी रोड,नेताजीनगर), विजय नागनाथ राऊत (सावतामाळीनगर), शरद सोपान गलांडे (रा. गलांडवाडी नं.१), गणेश मोहन जामदार (राम वेसनाका), दादासाहेब दत्ता देवकर (लोहारगल्ली) अशी खासगी सावकारांची नावे असून महादेव हराळे यांनी त्यांचेविरूद्ध पोलीसात फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी यांनी आर्थिक अडचणीपोटी ऑगष्ट २०२० मध्ये वरील पाच सावकारांकडून २० लाख रूपये रक्कम व्याजाने घेतली होते. त्या बदल्यात फिर्यादी यांनी सावकारांना स्वतःच्या मालकीची मौजे वडापुरी ता. इंदापूर येथील शेत जमीन गट नं.१२ व गट नं.६४६/१ क्षेत्र ६ एकर २० गुंठे जमीन खरेदी दिली होती. त्यावेळी फिर्यादी यांनी सावकाराचे पैसे व्याजासह परत केल्यानंतर सदरची जमीन सावकारांनी फिर्यादीला खरेदी खत करून परत देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे दिवसापासुन फिर्यादी यांनी सावकारांना तुमचे पैसे व्याजासह परत घ्या व जमीन परत खरेदी करून देण्याची विनंती वारंवार केली होती.
संबधित सावकार यांनी व्यवहारात ठरल्यानुसार फीर्यादींकडून खरेदी केलेली जमीन परत खरेदी देण्यास नकार दिला. उलट फिर्यादीलाच दमदाटी करू लागले. प्रसंगी जीवे मारण्याची धमकीही दिली. सावकारांची दमदाटी व धमक्यांना घाबरून फिर्यादी यांनी सोमवार दि.२० डिसेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांची तब्येत स्थिर असून त्यांचेवर इंदापुरातील खासगी हाॅस्पिटलमधील आय. सी. यु. मध्ये उपचार सुरू आहेत. फिर्यादी शुद्धीवर आल्यानंतर इंदापूर पोलिसांनी त्यांचे जबाब घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील हे करत आहेत.
२०१४ मध्ये महाराष्ट्रात सावकारी कायदा लागू करण्यात आला. यापूर्वी अवैध सावकारी हा अदखलपात्र गुन्हा होता. परंतु नवीन कायद्यान्वये हा अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे. या कायद्यान्वये वैध व अवैध सावकारांना कर्जासाठी कर्जदाराच्या जमीनी गहाण, विक्री, लिज तसेच अदलाबदली करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर विनापरवाना वा अवैध सावकारी केल्याचे निदर्शनास आल्यास सावकारी कायद्यानुसार संबधितास पाच वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा पन्नास हजार रूपयापर्यंत दंड यापैकी एक किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षेची तरतुद आहे.