कुरुळी : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्या दोन-दोन रिंगरोडबाबत खेड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. नगररचना विभागाने मोई-कुरुळीसह परिसरातील गावांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) खेड तालुक्यातील मोई, कुरुळी, चिंबळी, निघोजे व लगतच्या गावांमधून कुठल्याही रस्त्याची आखणी प्रस्तावित नसल्याचे लेखी पत्र नुकतेच दिले होते. मावळ, हवेली, भोर, पुरंदरसह खेड तालुक्यातूनही नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या दुसऱ्या रिंगरोडला शेतकऱ्यांनी विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेच्या हद्दीबाहेर प्रादेशिक विकास आराखड्यात प्रस्तावित असलेल्या रिंगरोडबाबत मोई, कुरुळी आदी खेड तालुक्यातील गावांनी जोरदार विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने एमएसआरडीसीला दिलेल्या मान्यतेनुसार रिंगरोडची नव्याने आखणी करण्यात येत असल्याने येथील शेतकरी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. पीएमआरडीएच्या रिंगरोडपासून काही अंतरावरून या रिंगरोडची ही आखणी होत असल्याने या भागातील शेतकऱ्यांचेयात मोठे नुकसान होणार असल्याची कैफियत येथील शेतकरी मांडत आहेत.
रिंगरोडबाबत शेतकरी संभ्रमात
By admin | Published: February 22, 2017 1:58 AM