वाघोली : महावितरणच्या उच्चदाब वीज वाहिनीचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २) सकाळी साडेनऊच्या सुमारास पेरणे (ता. हवेली) येथील जगताप वस्ती येथे घडली. एक गाय व पाळीव कुत्र्याचा देखील करंट बसून मृत्यू झाला असून, शेतकऱ्याचा मुलगा व पत्नी थोडक्यात बचावले आहेत. एचटी लाईनच्या तुटलेल्या तारेबाबत एमएसईबीला कळवूनसुद्धा काम केले नसल्यामुळे एमएसईबीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. भगवान रामकृष्ण जगताप (रा. जगताप वस्ती) असे करंट लागून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर शेतकऱ्याचा मुलगा ऋत्विक व पत्नी मीनाक्षी थोडक्यात बचावले आहेत. शेजारी असणारे संतोष जगताप, प्रकाश कोंडे यांनी जगताप कुटुंबीयांना वाचविण्याचा प्रयत्न केला. ऋत्विक व मीनाक्षी यांना वाचविण्यात यश आले परंतु भगवान जगताप यांना वाचविता आले नाही. त्यांना उपचारासाठी वाघोली येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जगताप यांची गाय व पाळीव कुत्र्याचादेखील करंट लागून मृत्यू झाला आहे.......प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप वस्ती येथील एका शेतामध्ये जगताप कुटुंबीय गुरे चारण्यासाठी गेले होते. गुरे चरत असताना एका गाईला करंट लागून ती पडल्याचे ऋत्विक जगताप याला दिसले. त्याने गाईला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला असता त्यालासुद्धा करंट बसला. च्तेथेच जवळ असणारे भगवान जगताप यांनी ऋत्विकला जोराचा धक्का दिला. धक्का दिल्यानंतर ऋत्विक बाजूला पडला परंतु भगवान जगताप यांना जोरदार करंट बसला. यामध्ये मीनाक्षी जगताप यांनासुद्धा करंट बसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू ; मुलगा व पत्नी थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 10:17 AM
एमएसईबीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
ठळक मुद्देपेरणे-जगताप वस्ती येथील घटना