जेजुरी : जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे नाझरे क.प. येथील शेतकरी लक्ष्मण राघू नाझीरकर यांना मोबाईल कंपनीचा टॉवर टाकून देण्याच्या नावाखाली सलग दोन वर्षे फसविणाऱ्या भामट्याला गजाआड केले. सुमारे साडेतेरा लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आणण्यात जेजुरी पोलिसांना यश आले आहे. आरोपी जीवन ऊर्फ राजेंद्र गणपत जाधव (वय ४५, रा. नाखरे, ता. जि. रत्नागिरी, खोटे नाव नितीन श्रीधर साळवी) याची सोमवारी येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी लक्ष्मण नाझीरकर आणि त्यांची पत्नी सुमित्रा नाझीरकर यांच्याशी आरोपी राजेंद्र जाधव याने नितीन साळवी या खोट्या नावाने सन २०१२ साली ओळख करून करून घेतली. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर, ‘तुमच्या शेतात एयरसेल कंपनीचा टॉवर टाकून देतो. यातून तुम्हाला महिन्याला एक लाख रुपयांचे मोठे उत्पन्न मिळेल’ असे सांगून वेळोवेळी पैसे उकळले. आरोपींनी गेल्या दोन वर्षांत या दाम्पत्याकडून टॉवर लाइनच्या उभारणीस लागणारी कागदपत्रे गोळा करणे, टॉवर लाइनचे जनरेटर खरेदी करणे, जनरेटरसाठी लागणारे डिझेल आणण्यासाठी सुमो गाडी खरेदी करणे, सर्व विभागांची परवानगी काढण्यासाठी आणखी पैसे द्यावे लागतात, असे म्हणून वेळोवेळी सुमारे तेरा लाख ३५ हजार रुपये उकळले होते. पैसे देऊनही टॉवर उभारण्याचे काम होत नसल्याचे निदर्शनास आल्याने शेतकऱ्याने जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली होती.फिर्यादीनुसार जेजुरी पोलीस ठाण्याचे स. पो. नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव यांनी तपास करून, आरोपीला गेल्या २ जून रोजी अटक केली. पोलीस कोठडी घेऊन आरोपीची कसून तपासणी करून, आरोपीकडून दोन दुचाकी, एक चारचाकीसह सुमारे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीस आज सासवड न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. (वार्ताहर)
मोबाईल टॉवर देतो म्हणून शेतकऱ्याची फसवणूक
By admin | Published: June 15, 2016 4:53 AM