दौंड : तालुक्याच्या पूर्व भागात अनेक गावांना कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यातच वेळोवेळी होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तेव्हा पूर्व भागात वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरदचंद्र सूर्यवंशी यांनी विद्युत महावितरण कंपनीला दिलेला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण, बोरीबेल, काळेवाडी, ज्योतिबानगर, हिंगणीबेर्डी येथील भीमा नदीतीरावर शेतकऱ्यांचे कृषीपंप आहेत. वेळोवेळी होणारा खंडित वीजपुरवठा आणि कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे या पंपाचे नुकसान होत आहे. उन्हाळी पिके केवळ पाणी आणि वीज पुरवठ्याअभावी जळून जाण्याच्या परिस्थितीत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हवादिल झाला आहे. याचा विचार महावितरणने करावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर हरिश्चंद्र सांगळे, किरण चव्हाण, डॉ. रामहरी सूर्यवंशी, भाऊसो कोपनर, आनंद शेळके, बापू गायकवाड, नितीन धगाटे यांच्या सह्या आहेत.
खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हैराण
By admin | Published: March 31, 2017 2:22 AM