थेऊर - गेल्या दहा-बारा वर्षांपासून कुंजीरवाडीची (ता. हवेली) डोकेदुखी आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरत असलेल्या कचºयाचा ढीग हटविण्यासाठी एका ग्रामस्थाने स्वत:च्या शेतातील जमीन दिली. त्यामुळे अखेर कच-याचा ढीग कायमस्वरूपी हटविण्यात आला. सरपंच सुनीता धुमाळ यांनी पुढाकार घेत जेसीबी आणि डंपरच्या साह्याने ही कचराकुंडी हलविण्यास लावले.गावठाण परिसरामध्ये असलेल्या या कचºयामुळे गावामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय दर दोन-तीन महिन्यालाच या कच-याला आग लागून पेटलेला कचरा उडून अनेकांच्या घरात अंगणात पडत असल्याने त्याचा धोका वाढला होता. यावर अनेक वेळा तक्रारीही झाल्या परंतु हा कचरा नेमका कुठे हलवायचा हा प्रश्न होता. मात्र गावकºयांशी चर्चा केल्यावर गावातील धनश्री कार्यालयाचे मालक प्रभाकर धुमाळ यांनी कचरा टाकण्यासाठी स्वत:च्या मालकीची शेतजमीन दिल्यामुळे गावाचा हा कचरा प्रश्न मिटला आहे.ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे नागरिकांत तसेच शालेय विद्यार्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरपंच सुनीता धुमाळ यांनी उपसरपंच गोरख तुपे, माजी उपसरपंच दत्तात्रय कुंजीर, माजी सरपंच सचिन तुपे, माजी सरपंच संतोष कुंजीर, माजी सरपंच अनुराधा कुंजीर, श्रीनाथचे चेअरमन संदीप धुमाळ, श्रीराम सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुरेश गाढवे, राहुल धुमाळ, भाऊसाहेब कुंजीर, दिलीप कुंजीर, गुलाब गाढवे, संदीप शिवाजी धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य नाना अंकुश कुंजीर, ग्रामसेवक गळवे, यांच्याशी विचारविनिमय करुन हा कचरा उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.४कुंजीरवाडी हे पुणे-सोलापूर महामार्गावरील वेगाने वाढत चाललेले बाजार ठिकाण आहे. पुणे शहरालगत असल्याने येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, येथील कचरा यापूर्वी गावातील मुख्य वस्तीत गोळा केला जात होता.बाजूला एक माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि गावाची स्मशानभूमी असल्याने येथील विद्यार्थ्यांना तसेच दशक्रिया व अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना दुर्गंधी व धुराचा कायमच त्रास सहन करावा लागत होता.
गावातील कचऱ्यासाठी ग्रामस्थाने दिले स्वत:चे शेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:58 AM