पुणे : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जोरदार अंमलबजावणीजिल्ह्यात सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केली आहे. या गावांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देताना अडथळा निर्माण झाली असून, ही सहा गावे वगळून अन्य गावांना पहिल्या, दुसऱ्या टप्प्यात वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यामुळे बारामती तालुक्यातील मुर्डी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी, भिवरी आणि दौंड तालुक्यातील बिरोवावाडी ग्रामपंचायती मधील शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यात जाहीर होणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. राज्यसह जिल्ह्यातील दोन गावांमध्ये शुक्रवार (दि.२८) पासून शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील अन्य सर्व गावांमध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेची तातडीने अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश दिले. पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना तब्बल १२०० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या चार-पाच दिवसांत गावागावांमध्ये दिवस-रात्र कर्जमाफी योजनेचे काम सुरू आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे आणि त्यानंतर कर्जमाफीचे खाते प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू आहे. गेल्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यातील तब्बल ४० हजार ९१७ शेतकऱ्यांची बँक खाती प्रमाणीकरण करून झाली असून, येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. जिल्ह्यात बारामती तालुक्यातील मुर्डी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी, भिवरी आणि दौंड तालुक्यातील बिरोवावाडी ग्रामपंचायतीसाठी २९ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर ३० मार्चला मतमोजणी होणार आहे. यामुळे सध्या या गावांमध्ये निवडणूक आयारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता असलेल्या भागात कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ देता येत नाही. त्यानुसार या गावांमध्ये आता कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी निवडणूक संपण्याची वाट पाहावी लागले. त्यानंतर एप्रिल महिन्यात तिसऱ्या यादीमध्ये या सहा गावांतील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील ६ गावात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचा कर्जमाफी योजनेला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 7:50 PM
आतापर्यंत ४० हजार ९१७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
ठळक मुद्देपुणे जिल्ह्यामध्ये सुमारे दीड लाख शेतकऱ्यांना तब्बल १२०० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार