उत्तरप्रदेशातील शेतकरी अत्याचार विरोधात पुण्यात निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 05:16 PM2021-10-04T17:16:26+5:302021-10-04T17:21:18+5:30
विरोधी पक्षांकडून भाजप विरोधात आंदोलन
पुणे : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा मोनू मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. उपमुख्यमंत्री केशव मोर्य यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी तिकोनिया येथे जमले होते. त्यांच्यावर गाडी आदळण्यात आली आहे. मोर्य हे टेनी यांच्या मुळ गावी योजनांच्या उद्घाटनासाठी जात होते.
यावेळी आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चढविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. संतप्त शेतकऱ्यांनी टेनी यांच्या मुलाच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या तीन गाड्या पेटवून दिल्या होत्या. त्याचे पडसाद सर्व देशात उमटू लागले आहेत. विरोधी पक्षांकडून भाजप विरोधात आंदोलन छेडली जात आहेत.
पुण्यातही वसंतराव नाईक पुतळा शिवाजीनगर येथे उत्तरप्रदेशातील शेतकरी अत्याचार विरोधात संयुक्त शेतकरी बचाव आंदोलनातर्फे निदर्शने करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, जनता दल (से), शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती, लोकायत, मराठा सेवा संघ आदी सहभागी झाले होते.
'तानाशाही नही चलेगी, योगी सरकार अन्यायाचे सरकार, शेतकऱ्यांना चिरडणारे सरकार अशा घोषणा देत संघटनाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला. तर शेतकऱ्यांना धडा शिकवा अशी जाहीर भाषा करण्याएवढा सत्तेचा माज भाजपला चढला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.'
यावेळी मोहन जोशी, अभय छाजेड, बी जी कोळसे पाटील, प्रशांत जगताप, नितीन पवार रमेश बागवे, कमल व्यवहारे आदी उपस्थित होते.