पुणे: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातील माळेगाव येथे असणाऱ्या गोविंदबाग या निवास स्थानावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. आज सकाळ पासूनच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उजनीचे ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय नुकताच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रद्द केला आहे. त्यानंतर उजनीचे पाणी प्रकरण चांगलेच पेटले आहे. इंदापूर तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. येथील राष्ट्रवादीच्या स्थनिक कार्यकर्त्यासह शेतकरी आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे इंदापूर आणि सोलापूर चा वाद धुमसतच आहे. या पार्शवभूमीवर मोहोळ तालुक्यातील शेतकरी गोविंद बागे समोर आंदोलनासाठी येणार असल्याने हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान आंदोलनासाठी आलेले मोहोळ येथील दोन शेतकऱ्यांना पोलिसांनी माळेगाव येथे ताब्यात घेतले आहे. आणखी किती आंदोलक येणार आहेत, तसेच आंदोलन केव्हा आणि कधी होणार, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.