महावितरणकडून शेतकऱ्यांचे वीज तोडून वीजबिल भरण्याचा तगादा लावला जात आहे. वीज तोडणे थांबविले नाहीत तर आंदोलनाचा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे.
शिक्रापूर येथील विद्युत वितरण कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंडित भुजबळ, भाजपा युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नितीन गव्हाणे, पिंपळे खालसाचे माजी सरपंच राजेंद्र धुमाळ, विशाल गव्हाणे यांसह आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. मार्च अखेर असल्यामुळे सोसायटीचा भरणा परस्पर कपात केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसे देखील नाहीत. त्यामध्ये शेतकऱ्यांना वीजबिलासाठी तगादा लावणे योग्य नाही, असे जयेश शिंदे यांनी सांगितले. शिक्रापूर महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांना निवेदन देण्यात आले.
चौकट
वीजबिले मिळत नव्हती तर मागून का घेतली नाही?
वापरलेल्या विजेचे बिल देणे, हे सभ्य ग्राहक म्हणून कर्तव्य
गेली अनेक वर्षे ज्यांना वीजबिले मिळत नव्हती, त्या शेतकऱ्यांनी महावितरणशी संपर्क करून आपली
थकीत बिले का घेतली नाहीत? असा प्रतिप्रश्न महाजन यांनी या वेळी उपस्थितांना केला. तसेच, वापरलेल्या विजेचे बिल देणे, हे सभ्य ग्राहक म्हणून कायद्याने दायित्व आहे, असे नितीन महाजन यांनी पटवून दिले.
फोटो ओळ – शिक्रापूर ता. शिरूर येथील विद्युत वितरण कार्यालयात निवेदन देताना भाजपा पदाधिकारी व शेतकरी.