सुपे : शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीसंदर्भात अद्याप अस्पष्टता असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पीककर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्हा बॅँका ओस पडलेल्या दिसत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून विधिमंडळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यावरुन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरीवर्ग कर्जमाफी कधी होईल याकडे लक्ष देऊन आहेत. मात्र, शासनाकडे कर्जमाफीच्या संदर्भात अद्याप अस्पष्टता असल्याने शेतकरीवर्ग गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पीककर्ज भरण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत सात दिवसांवर आली असल्याने शेतकऱ्यांकडून अद्याप बँकांकडे भरणा केला जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जाची फेड केल्यास शुन्य टक्के व्याजदर जिल्हा बँकेकडून आकारला जातो. मात्र, एप्रिल महिन्यापासून मागील पीककजार्ला ६ टक्के तर थकीत कर्जाला १२ टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. तर पुन्हा कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. मात्र, कर्जमाफी होईल या आशेवर येथील शेतकरीवर्गाने बॅँकांकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान, येथील जिल्हा बँकेच्या शाखेत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात खरीप आणि रब्बी मिळून येथील अकरा विविध कार्यकारी सोसायट्यांना सुमारे ३२ कोटींचे कर्जवाटप केले आहे. तर मध्यम मुदतीचे सुमारे ४ कोटी कर्जाचे वाटप केले आहे. मात्र ३१ मार्चला सात दिवस बाकी राहिले असतानाही एकही टक्का वसुली शेतकऱ्यांची आली नसल्याची माहिती बॅँकेच्या अधिकृत सूत्रांनी दिली. (वार्ताहर)
कर्जमाफीच्या अस्पष्टतेमुळे शेतकरी गोंधळात
By admin | Published: March 26, 2017 1:23 AM