मंचर: गेल्या पंधरा दिवसांपासून मागणी नसल्याने पालेभाज्यांचे भाव ढासळले आहे. अजूनही भावात होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या जो दर मिळत आहे त्यातून गुंतवलेले भांडवलदेखील मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, शुक्रवारी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथीला शेकडा ५०१ रुपये तर कोथिंबिरीला शेकडा ८५० रुपये दर मिळाल्याची माहिती सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
पालेभाज्यांचे बाजारभाव ढासळले आहेत. शेतकरी बाजारभाव वाढण्याची वाट पाहत आहेत. मात्र अनेक दिवस झाले बाजारभाव स्थिर आहेत. मध्यंतरी मेथी,कोथिंबीर अक्षरशः फेकून द्यावी लागत होती. सध्या मेथीची एक जुडी दोन ते पाच रुपये या दराने विकली जात आहे. तर कोथिंबिरीला शेकडा १०१ ते ८५० रुपये असा भाव मिळत आहे. ठोक बाजारात बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी किरकोळ बाजारात पालेभाज्या विकण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या पंधरा दिवसांत मागणी नसल्याने अक्षरशः पालेभाज्यांना मिळेल त्या भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वाहतूक खर्चही वसूल होत नसून अनेक शेतकऱ्यांचे भांडवल अंगावर आले आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान या काळात झाले आहे.
महागाई वाढल्याने मेथी कोथिंबीर यांच्या भांडवली खर्चात वाढ झाली. असे असतानाही अनेक शेतकऱ्यांनी धाडसाने ही पिके घेतली आहेत. मात्र बाजारभावाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला गेला आहे. पालेभाज्यांचे बाजारभाव काहीसे वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र उत्पादन जास्त निघत असल्याने बाजारभाव वाढत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात पालेभाज्यांचे दर स्थिर आहे.बाजार समितीत १३ हजार ७५५ मेथी जुड्यांची आवक होऊन शेकडा २०१ ते ५०१ रुपये असा भाव मिळाला आहे. कोथींबिरीच्या ८ हजार २५१ जुड्या आवक होऊन शेकडा १०१ ते ८५० रुपये भाव मिळाला आहे. पालेभाज्याचे बाजारभाव कमी झाल्याने मंचर शहरातील दररोजच्या बाजारात मेथी कोथिंबीर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. ग्राहकांची मागणी कमी असल्यामुळे अगदी पाच रुपयाला एक जुडी या दराने विक्री करावी लागत आहे. पालेभाज्यांचे बाजारभाव स्थिर आहेत, अशी माहिती मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी संदीप गांजाळे यांनी दिली.
०५ मंचर