मंचर:शेतकऱ्यांच्या हितांना प्राधान्य देण्यासाठी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती कटिबद्ध आहे. बाजार समितीच्या आवारात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे, असे प्रतिपादन सभापती देवदत्त निकम यांनी केले.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी निकम बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर माऊली गावडे, उपसभापती संजय शेळके, संचालक सखाराम काळे, दत्तात्रय तोत्रे,ॲड. बाळासाहेब बाणखेले, दत्तात्रय हगवणे, गणपतराव इंदोरे, अशोक डोके, शिवाजी निघोट, बाळासाहेब मेंगडे, ज्ञानेश्वर घोडेकर,बाळासाहेब बाणखेले, सागर थोरात, प्रमोद वळसे-पाटील आदी उपस्थित होते.
देवदत्त निकम म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आता स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. शेजारच्या तालुक्यात तरकारी बाजार सुरु झाल्यामुळे आवकेवर परिणाम झाला आहे. मॉलमध्ये भाजीपाला खरेदी केला जातो. अशी २५ भाजीपाला कलेक्शन सेंटर आहेत. व्यापाऱ्यांनी भविष्याचा वेध घेऊन व्यवसाय केला पाहिजे. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे शहरातील मॉल खेडेगावात आले. व्यापारात नवनवीन ट्रेण्ड येणार असून त्याचा सामना करण्यासाठी व्यापाऱ्यांनी सिद्ध राहावे. बाजार समितीचे संचालक तसेच व्यापारी हे चांगले काम करत आहे. व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांचा बाजार समिती मार्फत सन्मान केला जाणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली असून तीव्रता अजून वाढणार आहे.सर्वांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. बाजार समितीत ४०० पेक्षा जास्त नागरिकांची कोरोना तपासणी केली. त्यात सहाजण पॉझिटिव्ह निघाले आहेत. मात्र, बाजार समितीतील कोणीही नव्हते हे निकम यांनी नमूद केले.
या वेळी सर्वाधिक शेतमाल विक्री करणारे कांदा विक्री आडतदार, कांदा खरेदीदार,बटाटा विक्री केलेले आडतदार, तरकारी विक्री केलेले आडतदार, भाजीपाला विक्री केलेले आडतदार यांना सन्मानित करण्यात आले. विषय पत्रिकेचे वाचन सहाय्यक सचिव सचिन बोराडे यांनी केले. सूत्रचंलान संचालक दत्तात्रय हगवणे यांनी केले. आभार उपसभापती संजय शेळके यांनी मानले.
२७ मंचर बाजार समिती
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सभापती देवदत्त निकम.