विलास शेटे, मंचरइतर पिकांत अपयशी झाल्यानंतर साकोरे (ता. आंबेगाव) येथील शेतकरी दत्ता भिकाजी मोढवे यांनी ३० गुंठे क्षेत्रात कारली पिकाचे उत्पादन घेतले आहे. याच कारले पिकाने मोढवे यांना लखपती केले असून, खर्च वजा जाता चांगला नफा शिल्लक राहिला आहे. मोढवे यांची स्वत:च्या शेती आहे. तसेच इतर शेती खंडाने घेऊन पिके घेतात. पिकांचे यशस्वी उत्पादन घेण्याची किमया त्यांनी साधली आहे. झेंडू, मिरची आदी पिकांनी यापूर्वी त्यांना चांगला नफा मिळून दिला आहे. टोमॅटो पिकाने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. भांडवल अंगावर आले आहे. टोमॅटो पीक अयशस्वी झाल्यानंतर मात्र मोढवे यांनी शेतात वेगळा प्रयोग करण्याचे ठरविले.सुरूवातीस त्यांनी शेतात कोथिंबीर पीक टाकले. धना पिकाच्या भरवशावर अमनश्री जातीच्या कारली पिकाची लागवड केली. याद्वारे दुहेरी पिकाचा प्रयोग त्यांनी केला. कोथिंबीर पीक निघाल्यावर कारली पिकासाठी मांडव तयार करण्यात आला. तारेवरती कारले पीक घेण्यात आले आहे. आतापर्यंत तीन औषध फवारण्या झाल्या आहेत. रासायनिक खताबरोबरच कोंबडी खताचा वापर केला. कारले पीक जोमदार आले आहे. ३० गुंठे क्षेत्रात ४० हजार रुपये खर्च आला आहे. मात्र दत्ता मोढवे यांना आजअखेर कारली पिकातून सव्वादोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अजून दोन लाख रुपये नफा अपेक्षित आहे. कारली पिकाचे भांडवल पाहता या पिकाने मोढवे यांना लखपती केले आहे.
कारल्याच्या पिकामुळे शेतकरी लखपती
By admin | Published: August 08, 2016 1:23 AM