केंद्राने दिले १४ कोटी रुपये : फक्त ६ कोटी ५८ लाखांचीच झाली वसुली
पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेतून वगळलेल्या जिल्ह्यातील करदात्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर केंद्र सरकारकडून १४ कोटी ६ लाख रुपये जमा केले होते. ते सर्व पैसे या करदात्या शेतकऱ्यांनी परत करावेत, असा आदेश केंद्र शासनाने काढला आहे. कारण चुकून ते पैसे वगळलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात गेले होते. मात्र, आतापर्यंत केवळ ६ कोटी ५८ लाख रुपये परत मिळाले आहेत. तब्बल ७ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये परत करण्यास करदात्या शेतकऱ्यांनी ठेंगा दाखवला आहे. उर्वरित रक्कम लवकर परत करा; अन्यथा कारवाई करू, असा इशारा पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेत पुणे जिल्ह्यातील एकूण ५ लाख ३३ हजार २०० लाभार्थी आहेत. त्यापैकी ४ लाख ८८ हजार ४७९ शेतकरी पात्र आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दर चार महिन्यांनंतर केंद्रशासन २ हजार रुपये असे वार्षिक एकूण ६ हजार रुपये जमा करत असते. या योजनेत २१ हजार १७८ करदात्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. मात्र, तरीही केंद्र शासनाकडून या शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ कोटी ६ लाख रुपये जमा करण्यात आले. ते पैसे परत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या शेतकऱ्यांना वारंवार नोटिसा काढल्या आहेत. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक करदात्या शेतकऱ्यांनी पैसे परत करण्यास ठेंगा दाखवला आहे.
----
* पीएम किसान योजनेचे एकूण लाभार्थी :- ५ लाख ३३ हजार २००
* आतापर्यंत परत आलेली एकूण रक्कम :- ६ कोटी ५८ लाख १६ हजार रुपये
* पैसे परत करा म्हणून नोटिसा पाठवलेले एकूण करदाते शेतकरी :- २१ हजार १७८
* करदात्या शेतकऱ्यांकडून पैसे परत येणे बाकी असलेली रक्कम :- ७ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये
----
४४ हजार ७२१ शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही
पुणे जिल्ह्यातील एकूण लाभार्थी ५ लाख ३३ हजार २०० शेतकऱ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ४७९ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा थेट लाभ मिळत आहे. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे ४४ हजार ७२१ शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
----
अत्यंत अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने सन २०१८ पासून राज्यात प्रधानमंत्री किसान योजना सुरू केली आहे. कमीत कमी २ हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मानधन यामध्ये दिले जाते.
- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक
----
प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी वारंवार अर्ज भरून दिला आहे. मात्र, प्रत्येक वेळी तांत्रिक कारणाने अर्ज बाद केल्याचे संबंधित अधिकारी, कर्मचारी सांगतात. त्यामुळे या योजनेत फटका बसत आहे.
- हनुमंत नारनोर, शेतकरी
----
आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत. आमचं उत्पन्न अत्यंत तुटपुंजे आहे. आम्ही पात्र असूनही या योजनेचा लाभ मिळत नाही. जे करदाते शेतकरी आहेत, त्यांच्या खात्यावर शासन पैसे जमा करतेय. मात्र, पात्र असूनही आम्हाला वंचित ठेवते. हा कुठला न्याय आहे.
- नवनाथ कदम, शेतकरी