सतीश सांगळे । लोकमत न्यूज नेटवर्ककळस : राज्यातील शेतकऱ्यांस हमखास उत्पन्न मिळवून देणारे म्हणून डाळिंबाची ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट नियोजन, कौशल्यपूर्ण व्यवस्थापन आणि निर्यातक्षम मालाच्या उत्पादनाद्वारे डाळिंब उत्पादकास मागील काही वर्षांत चांगले दिवस आले. मात्र, चालू वर्षी ऐन हंगामात डाळिंबाचे दर घसरल्याने उत्पादक निराश झाले आहेत. फेब्रुवारीत निर्यात हंगामाच्या सुरुवातीस १२० ते १४० रु. दर असणारे डाळिंब आता कांद्या-बटाट्याच्या किमतीत विकण्याची वेळ आली आहे. द्राक्षांचे पडलेले दर, आंब्याची व इतर फळांची उपलब्धता आणि खरेदीतील पडतळ पाहता स्थानिक ग्राहकाकडून डाळिंबाचा उठाव कमी होत आहे. स्थानिक बाजारपेठेत दर गुणवत्तेनुसार १५ ते ५० रुपयेवर आले आहेत. चालू वर्षी सुरुवातीस डाळिंबास अपेक्षित दर मिळाला. एप्रिल आणि मेमध्ये उन्हाच्या आणि उष्णतेच्या प्रभावाने डाळिंबाची गुणवत्ता ढासळते. इंदापूर तालुक्यातील कळस, कडबनवाडी, शेळगाव, निमगाव, रुई, न्हावी आदी भागात डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. तालुक्यात सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब लागवडीखाली आहे. मात्र, डाळिंब पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लाखोंची उलाढाल होत असते. डाळिंबाचे चांगले उत्पादन होऊन त्यास बाजारभाव मिळाल्यावर बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण असते. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी चांगले चार पैसे मिळवून देणारे पीक नाही. शेतकऱ्याांकडे पैसा नसल्याने येथील व्यावसायिकांनाही मंदी जाणवत आहे. अशातच बँका शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीचा तगादा लावत आहेत. शेतकऱ्याला आधार देण्यासाठी काहीतरी मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मोठा खर्च करुन डाळिंबाची लागवड केली. झाडे बहर धरण्यायोग्य झाल्यावर बहर धरण्याच्या तयारीत सलग तीन वर्ष केवळ झाडे जगविण्यासाठीच खर्च करावा लागतो. शेवटी बाग काढून टाकावी लागत आहे.
दर घसरल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी निराश
By admin | Published: May 13, 2017 4:27 AM