बारामती : नीरा डाव्या कालव्याच्या वितरिकेत बेकायदा सायफन टाकून पाणीचोरी केल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील ४७ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. या कारवाईमुळे दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरीवर्गात खळबळ उडाली आहे.या घटनेची फिर्याद पाटबंधारे विभागाचे दशरथ तात्याबा पवार यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नीरा डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे. या कालव्यातून वितरिकेतही पाण्याचे आवर्तन सुरू आहे. या ४७ शेतकऱ्यांनी बेकायदा या वितरिकेत सायफन टाकून विहिरीत पाणी सोडले होते. याबाबत कालवा निरीक्षक नरहरी चांदगुडे यांनी संबंधित शेतकऱ्यांना वारंवार सूचना दिल्या. कऱ्हावागज, मेडद परिसरातील हे शेतकरी आहेत. पाटबंधारे खात्याच्या सूचनेकडे या शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
By admin | Published: August 31, 2015 3:53 AM