बारामती : उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथील शेतकऱ्याची ४ एकर काढणीला आलेली ज्वारी जळून खाक झाली. शेतकरी संजय कोकरे यांचे गाडीखेल गावाच्या शेती आहे. अचानक लागलेल्या आगीमध्ये जनावरांच्या चाऱ्यासह ज्वारी जळाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.यामध्ये १ लाखाहून अधिक नुकसान झाल्याचे कोकरे यांनी सांगितले.
संजय कोकरे यांचे गाडीखेल येथे शेत आहे. सोमवारी (दि. २२) सकाळी त्यांच्या शेतात मजुरांसह ज्वारी काढणीला सुरवात केली होती. दुपारी १२ च्यासुमारास शेताच्या बाजुला अचानक आग लागल्याचे दिसल्याने कशीबशी चरण्यासाठी बांधलेली जनावरे सोडून दिली.वाऱ्याचा वेग अल्यामुळे आग झपाट्याने वाढत होती.आग विझविण्यासाठी शेतकऱ्यासह मजुरांनी धाव घेतली. मात्र आग नियंत्रणाबाहेर जाऊन चार एकरवरील संपूर्ण क्षेत्रात पसरली. यात ज्वारी पिक आणि गुरांसाठी गोळा करून ठेवलेला चारा जळून हाता तोंडाशी आलेले पिक जळून खाक झाले. आग लागल्याचे कोणतेही कारण समजले नाही.जवळपास ३ तासानंतर विहिरीवरील मोटरच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे संजय कोकरे यांनी सांगितले. मात्र ऐन उन्हाळ््याच्या सुरूवातीला जनावरांचा चारा जळाल्याने कोकरे यांच्या समोर चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
गारपीठ, अतिवृष्टी अशा इतर संकटांचा सामना करुन मोठ्या कष्टाने ज्वारीचे पिक उभे केले होते. परंतु हातातोंडाशी आलेले ४ एकर ज्वारीचे पिक होत्याचे नव्हते होऊन जवळपास १ लाखाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळावी.संजय कोकरे (शेतकरी)