ओझर : ‘जे न करी लल्लाटी, ते करी तलाठी’ असे ग्रामीण भागात म्हटले जाते. कुत्र्याच्या भीतीने दमछाक होऊन झाडावर चढलेला तलाठी कुत्र्याला म्हणतो, ‘तुला माहीत नाही, तू कुणाशी पंगा घेतोय तुला एक गुंठा जरी जमीन असती ना मग तुला कळले असते, तलाठी काय चीज आहे,’ अशीच अवस्था एका शेतकऱ्याची झाली आहे.जुन्नर तालुक्यात आमदारांचे तलाठी मारहाण प्रकरण धगधगत असतानाच, नुकतेच पांगरीतर्फे ओतूर येथील तलाठ्याने दुष्काळाची पार्श्वभूमी असूनदेखील स्वत:च्या अहंकारापोटी वरिष्ठांच्या सूचनांना केराची टोपली दाखवत एका शेतकऱ्याच्या चार महिन्यांपूर्वी नव्याने तयार झालेल्या विहिरीच्या नोंदणीसाठी, गेली तीन-चार महिने वेठीस धरले आहे. शेवटी या शेतकऱ्याला महसूल विभागाच्या लालफितीच्या कारभाराचा हिसका दाखवला आहे, तलाठी कार्यालयातच बसून गावाची सांगोवांगी पीक पाहणी नोंदवणाऱ्या महसूल खात्यात निर्ढावलेल्या काही निवडक तलाठ्यांमुळे शेतकरी वर्ग अक्षरश: मेटाकुटीस आला आहे .दुष्काळाची चाहूल ओळखून या शेतकऱ्याने सहा महिन्यांपूर्वी आपली जागा विहिरीत काही हिश्श्याच्या पाणी वापराच्या मोबदल्यात त्याचे बंधू तालूक्यातील कांद्याचे एक प्रथितयश व्यापारी यांना दिली. त्यांनी स्वखर्चाने या जागेत विहीर खोदकाम केले .विहिरीला चांगले पाणी लागले. विहिरीचे आरसीसी बांधकाम करून सुमारे सहा लाख रुपये खर्च केला. आता विहिरीची महसूल दप्तरी नोंद करून वीजजोडणी घायची व विहिरीचा पाण्याचा वापर सुरू करायचा दुष्काळात लोकांच्या विहिरींना पाणी नाही, आपल्या विहिरीला पाणी लागले आहे. आता आपण आपल्या बरोबर लोकांचीही तहान भागवू शकतो, या आनंदात हे दोघे भाऊ होते. परंतु, विहिरींची महसूल दफ्तरी नोंद झाल्याशिवाय वीजजोडणी मिळत नाही, वीज जोडणीशिवाय विहिरीतील पाण्याचा वापर हे शेतकरी करू शकत नव्हते. या विहिरीच्या नोंदणीसाठी तलाठ्याकडे गेल्यानंतर या आनंदावर विरजण पडले, तीन महिने या शेतकऱ्यांनी विहीर नोंदणीसाठी हेलपाटे मारले. शेवटी ही विहीर गावातील जबाबदार लोकांच्या सांगण्यानुसार ओढ्यात अतिक्रमणात आहे मी नोंद करू शकत नाही, असे सांगून तुमचे प्रकरण मार्गदर्शनासाठी तहसीलदार यांच्याकडे पाठविले आहे, असे उत्तर दिले. हे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे देऊन एक महिना उलटला, तरी त्यावर काही हालचाल नाही. यावर शेतकऱ्याला तलाठ्याने आकडे टाकून वीज घेण्याचा सल्ला दिला आहे़
विहिरीच्या नोंदणीसाठी चार महिन्यांपासून शेतकरी वेठीस
By admin | Published: May 22, 2016 12:43 AM