निमोणे : साईकृपा साखर कारखान्याकडून १८ महिने होऊनही थकीत एफआरपीची रक्कम मिळत नसल्याने अखेर शिंदोडी (ता. शिरूर) येथील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी बायका-मुलांसह येथील मंदिरात ठिय्या मारत आंदोलनास सुरुवात केली आहे. २०१४-१५ या गळीत हंगामातील साईकृपा शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रिज लि. हिरडगाव (ता. श्रीगोंदा) या कारखान्याकडून एफआरपी देणे बाकी आहे. हा खासगी साखर कारखाना माजी मंत्री बबनराव पाचपुते व विक्रमसिंह पाचपुते यांचा आहे. ऊस दिल्यानंतर एफआरपी प्रमाणे १४ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक असताना १८ माहिने उलटूनही हातात पैसे पडलेले नाहीत. हे सर्व ऊस उत्पादक शेतकरी सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत. हे शेतकरी गेली वर्षभरापासून पाचपुते यांना आतापर्यंत २५ ते ३० वेळा समक्ष भेटून बिलासंदर्भात विचारणा करीत आहेत. परंतु काही शेतकऱ्यांना अल्पसेच बिल देऊन त्यांची बोळवण केली आहे. उर्वरित पैशांसाठी वेळोवेळी वायदे करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.एकट्या शिंदोडी गावातील ३० गरीब शेतकऱ्यांचे सुमारे ७०-८० लाख रुपये येणे बाकी आहे. तालुक्यातील अन्य काही गावांतील शेतकरीही असेच फसवले गेले आहेत. वेळोवेळी मागणी करून घामाचे दाम मिळत नसल्याने आतापर्यंत संयम बाळगलेला शेतकरी आक्रमक झाला आहे. या उसाचे पैसे आणि त्यावर १८ % दराने व्याज मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आंदोलनामध्ये शिवसेना शाखाप्रमुख योगेश ओव्हाळ, ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ फडके, सहकारी संस्थेचे संचालक बाळासाहेब धावडे, पांडुरंग फडके, दत्तात्रय फडके, वैभव ओव्हाळ, संतोष टाकळकर, सुमन वाळुंज, परमेश्वर इंगोले आदी ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले असून, पैसे मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा त्यांनी निर्धार केला आहे. (वार्ताहर)
घामाचा दाम न मिळाल्याने शेतकऱ्यांचा मंदिरातच ठिय्या!
By admin | Published: March 04, 2016 12:39 AM