लोकमत न्यूज नेटवर्कमार्गासनी : वेल्हे तालुक्यात महावितरणकडून शेतकऱ्यांना व सामान्य व्यक्तींना योग्य सेवा मिळत नाही तर या वर्षीच्या पाणीटंचाईकाळात वेल्ह्यात एकच टँकर चालू आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खात्यांबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी नाराजी व्यक्त केली.वेल्हे तहसील कार्यालयात शुक्रवारी (दि. २३) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी मनोज जाधव, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, अमोल नलावडे, सभापती सीमा राऊत, उपसभापती दिनकर सरपाले, पंचायत समिती सदस्या संगीता जेधे, राजगडच्या संचालिका शोभाताई जाधव, नाना राऊत, चंद्रकांत शेंडकर, संदीप नगिने आदींसह सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. आमदार थोपटे यांनी सर्व खातेप्रमुखांकडून संबंधित खात्याची माहिती घेतली. लोकप्रतिनिधीकडून अडचणी जाणून घेतल्या. यामध्ये महावितरणकडून शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला योग्य सेवा मिळत नसल्याची माहिती मिळताच आमदारांनी नाराजी व्यक्त केली. या वर्षी पाणीटंचाईकाळात एकच टँकर सुरू असल्याने जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला. आगामी काळात योग्य नियोजन करावे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. वेल्हे तालुक्यातील शिक्षण विभागाबाबात बोलताना आमदारांनी शाळेंवर तोंडी आदेशानुसार असलेल्या शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणीच काम करावे, अशा सूचना प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनील मुगळे यांना दिल्या.परिवहन विभागास मुक्कामी गाड्या व हारपुड गाडी पुन्हा सुरू करावी. पानशेतला पास केंद्र सुरू करण्याची सूचना दिली. गुंजवणी धरणाचे काम शंभर टक्के झाले असले तरी पुनर्वसनाबाबत १०० टक्के झाले नाही. दोन नंबर गावठाणाला नागरी सुविधा लवकर देण्याच्या सूचना दिल्या. पोलीस ठाणे, पशुसंर्वधन, जिल्हा परिषद बांधकाम, आयटीआय, भूमीअभिलेख, वनखाते, दुय्यम निबंधक, कृषी विभाग, पीडीसीसी बँक, ग्रामीण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र या विभागांचा आढावा घेण्यात आला. या बहुतेक खात्यांमध्ये कर्मचारीसंख्या कमी असल्याने याचा परिणाम सेवांवर होत असून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर कर्मचारी आल्याशिवाय कोणत्याही खात्याने कर्मचारी सोडू नये, अशा सूचना आमदारांनी या वेळी दिल्या.
महावितरण, पाणीपुरवठा खात्यांबाबत शेतकऱ्यांत नाराजी
By admin | Published: June 26, 2017 3:39 AM