कामशेत : पंतप्रधान पीक विमा योजनेंर्गत मावळ, मुळशी, खेड, हवेली, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर आदी तालुक्यांतील खरीप हंगामातील भात पिकासाठी ३९ हजार रुपयांची संरक्षित रक्कम देण्यात आली होती. या विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ७८० रुपये भरून भात पिकाचा विमा काढता येणार होता. या पीक विम्याचा प्रथम भरणा २६५२ रुपये प्रति हेक्टर असा होता. त्यात केंद्र सरकारने ९३६ रुपये व राज्य सरकारने ९३६ व शेतकऱ्यांनी ७२० भरणा करून असा २६५२ रुपयांचा हा पीक प्रतिहेक्टर भात पिकासाठी उतरविण्यात आला. पीक कर्ज घेतले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी शासनाने हा पीक विमा काढणे बंधनकारक केले होते. यामुळे मावळातील ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बँकांकडून, विकास सोसायट्याच्या मार्फत पीक कर्ज घेतले होते अशा शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता विकास सोसायट्यांनी त्यांच्या सर्व क्षेत्राचा विमा उतरविला. त्याच्या भरण्याचे पैसे परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यातून कापले. यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढायचा नव्हता अशा सर्व शेतकऱ्यांवर या विम्याचा हप्ता बळजबरीने लादण्यात आला. अनेक शेतकरी त्यांच्या सर्वच क्षेत्रावर भात पीक घेत नाहीत. त्यांच्या शेतीतील काही क्षेत्र पडीक असते तर काही क्षेत्रावर वेगवेगळी पिके असतात. याचा कोणताही विचार न करता सर्वच क्षेत्राचा विमा उतरवल्याने शेतकऱ्यांचे विनाकारण आगाऊ पैसे कापण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी शासनाच्या बळजबरीच्या विमा योजनेने अस्वस्थ झाला आहे. पीक विमा देणारी एचडीएफसी इर्गो यांच्याकडे मावळातील पिकांचा विमा काढला आहे. त्यांच्याकडूनही मावळातील भात उत्पादक शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार की नाही, या विषयी संभ्रम निर्माण झाला आहे. विचारात न घेता विमा काढल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा विमा काढलेला आहे याची माहितीही नाही. यामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान झाल्याची तक्रारही केलेली नाही .यामुळे काही मोजकेच अर्ज विमा कंपनीकडे गेले आहेत. यामुळे या विम्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार कि नाही याची शंकाच आहे. या विम्याच्या काही अटी व वैशिष्ट्ये आहेत. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण राहील. पिके पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पावसातील खंड, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, पूर, कीडरोग आदींमुळे उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास विमा संरक्षण देण्यात येईल. अशा अटी असतानाही या वर्षी मावळातील भातपीक ऐन फुलोऱ्यात असताना व बी भरणीच्या वेळी पावसाची आवश्यकता असते. पण या वेळीच पावसात खंड पडल्याने मावळातील भात उत्पादनात सर्रास २५ टक्क्यांपर्यंत घट आली आहे. मावळातील डोंगरालगतच्या भात शेतीतील भात उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट आली आहे. असे असतानाही विमा कंपन्यांकडून अद्यापही शेतकऱ्यांना कोणतीच भरपाई अथवा विमा संरक्षण देण्याची घोषणा केलेली नाही. पीक विम्याच्या नावाखाली लूट तर होत नाहीना असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. या पीक विम्याचा शेतकऱ्यांना तर काही फायदा झालेला आढळत नाही. मात्र, याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांकडून पैसे उकळून विमा कंपनीने केलेला आढळून येतो. याशिवाय टेलिव्हीजनवर शासनाच्या पीक विम्याच्या जाहिरातबाजीने तर शेतकरी वर्ग भारावून जात आहे. भातपीक फुलोरा अवस्थेत असताना पावसाने उघडीप दिल्याने मावळातील सर्वच भात उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात २५ टक्क्यापर्यंत घट झाली आहे. तसेच डोंगरालगतच्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात त्यायांपेक्षाही अधिक घट होण्याची शक्यता आहे.- विनायक कोथिंबीरे तालुका कृषी अधिकारीशासनाने काढलेल्या जीआरनुसार ज्या शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेतले होते अशा सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा काढण्यात आला आहे. - हनुमंत रुपनवार विकास अधिकारी, पुणे जिल्हा सहकारी बँक, कामशेत
पीकविम्याबाबत शेतकरी संभ्रमात
By admin | Published: January 13, 2017 2:53 AM