भिगवण : भिगवण परिसरातील खते विक्री करणाऱ्या काही दुकानदारांकडून युरियाबाबत शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. जादा दर देणाऱ्या शेतकऱ्याला गुपचूप युरिया दिला जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकाराकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे आणि पोषक हवामानामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गहू आणि हरभरासारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली आहेत. या पिकांच्या खुरपण्या झाल्यामुळे गहू आणि हरभरा पोसण्यासाठी युरिया या रासायनिक खताचा डोस देण्यासाठी शेतकरी भिगवणच्या खत विक्री करणाऱ्या दुकानाकडे फिरत आहेत. मात्र, काही दुकानदार युरियासोबत इतर खते घेतली तरच युरिया दिला जाईल, अशी भूमिका घेत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. या खत दुकानदारावर नियंत्रण ठेवणारे कृषी खाते दुकानदाराच्या बचावाचा प्रयत्न करीत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे सरकारच्या जाहिरातीत दाखविले जाणारे अमर्यादित अनुदानित खत कुठे जात आहे? असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत, तर गोडाऊनमध्ये युरियाचा भरमसाट साठा असूनही शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अशा दुकानदार यांच्यावर कारवाई होण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. भिगवण परिसरात असणाऱ्या खत दुकानात विक्री करण्यात येणाऱ्या खतांच्या किमतीही तपासण्याची गरज आहे.
भिगवण परिसरात खते विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून युरिया वाटपाबाबत शेतकऱ्यांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:14 PM
भिगवण परिसरातील खते विक्री करणाऱ्या काही दुकानदारांकडून युरियाबाबत शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
ठळक मुद्देजादा दर देणाऱ्या शेतकऱ्याला गुपचूप युरिया दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोपभिगवण परिसरातील खत दुकानात विक्री करण्यात येणाऱ्या खतांच्या किमतीही तपासण्याची गरज