इंदापूर : लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेटमध्ये खास तरतूद करून १ हजार २०० कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेतून शेतीला पाणी मिळणार आहे. आगामी काळात पवार कुटुंबीयांना इंदापूर तालुक्यातील शेतकरी व जनता कदापि विसरणार नाही. कारण इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
इंदापूर येथे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गारटकर बोलत होते.
गारटकर म्हणाले की, सन १९९३ सालापासून या योजनेचा आम्ही पाठपुरावा करत होतो. ती योजना होते हे ऐकून मनस्वी आनंद झाला आहे. त्या काळातल्या संघर्षामध्ये, इंदापूर तालुक्यातील जे शेतकरी कार्यकर्ते आजपर्यंत होते. त्यांचे मनापासून अभिनंदन पात्र आहेत. ही योजना प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यामुळे योजना शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची मंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून होती. या योजनेचा पाठपुरावा चिकाटीने राज्यमंत्री भरणे यांनी केला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतीला व शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत. मात्र आगामी काळात शेतकऱ्यांना अद्यावत पद्धतीने शेती पिकवा, कमी पाणी वापरणे गरजेचे आहे. असेही आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
_______________________________________