पुणे : आज तरुणीदेखील तरुणांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्यामुळे त्यांच्या जीवनशैलीशी सुसंगत असाच जोडीदार त्यांना हवा आहे. त्यासाठी तडजोड करण्यास त्या तयार नाहीत. भावी जोडीदार हा एकतर एकाच प्रोफेशनल मधला असावा किंवा मल्टिनॅशनल कंपनीत अथवा एखाद्या मोठ्या हुद्यावर काम करणारा असावा. ‘शेतकरी’, ‘वकील’, पौराेहित्यकार’ किंवा ‘डॉक्टर’ नवरा नको रे बाबा! अशा तरुणींच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षांमुळे काही तरुणांवर ‘कुणी मुलगी देता का मुलगी?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
मुलींनी शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने उंबरठा ओलांडल्यानंतर स्वत:चा जोडीदार कसा असावा, हे त्या ठामपणे सांगू लागल्या आहेत. विविध क्षेत्र मुलींनी पादाक्रांत करीत पुरुषी वर्चस्वाला छेद दिला आहे. त्यांच्या भावी जोडादाराबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ग्रामीण भागात राहाणा-या आणि कमी शिक्षण घेतलेल्या मुलींच्या देखील जोडीदाराविषयीच्या संकल्पना अधिक सुस्पष्ट झाल्या आहेत. त्यांना गावापेक्षाही शहरी भागातील तरुणच जोडीदार म्हणून हवा आहे. मनासारखा जोडीदार मिळेपर्यंत त्या प्रतीक्षा करायला देखील तयार आहेत. मुली स्वत: कमावत्या झाल्याने मुलींचे लग्न ठरवताना आईवडीलदेखील कोणतीही तडजोड करण्यास तयार नाहीत, ही वस्तुस्थिती देखील पाहायला मिळत आहे.
----------------------------------------
या अटी मान्य असतील तरच ‘हो’ म्हणा....
* तरुण उच्चशिक्षित हवा.
* पुण्या-मुंबईत त्याचा स्वत:चा किंवा स्वत:च्या मालकीचा फ्लॅट हवा.
* स्वत:च्या जीवनशैलीशी मॅच करणारा असावा.
* शक्यतो एकुलता एक किंवा कोणतीही जबाबदारी नसणारा असावा.
* सासू-सासरे अन् एकत्र कुटुंब पद्धती नकोच.
----------------------------------------------------------------------------
‘इंजिनिअर’च हवा...
बहुतांश मुलींना ‘इंजिनिअर’ आणि मल्टिनॅशनल कंपनीतच काम करणारा जोडीदार हवाय. शहरी भागातील मुलींची एक विशिष्ट जीवनशैली विकसित झाल्याने पुण्या-मुंबईबाहेर जायला मुली तयार नाहीत. ग्रामीण भागात ही जीवनशैली राखणं अवघड होणार असल्याने गावाकडे कितीही प्रॉपर्टी, स्वत:चं घर असलं तरी मुलींची जाण्याची तयारी नसल्याचे विवाह संस्थांकडून सांगण्यात आले.
------------------------
सुशिक्षित कुटुंबांमध्ये विचारांपेक्षा लग्नपत्रिका पाहण्याकडे अधिक कल
‘लग्न’ हे दोन जीवांचे मनोमिलन असते. त्यामुळे वधू-वराचे किती गुण जुळत आहेत त्यावर त्यांचे लग्न यशस्वी होईल की नाही हे ठरते, अशी वधू-वराच्या कुटुंबीयांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात सुशिक्षित कुटुंबांमध्ये दोघांचे विचार किती जुळत आहेत, यापेक्षा देखील दोघांचे ग्रह जुळतात का? मुलगी ज्या घरी जाणार ती वास्तू कशी आहे, हे पाहण्याकडे कुटुंबीयांचा कल वाढला असल्याचे सांगण्यात आले.
----------------
तरुण-तरुणी स्वत: ज्या प्रोफेशनमध्ये आहेत. त्यातलाच जोडीदार त्यांना हवाय. लग्नाचा विचार करताना तरुणी आपली जीवनशैली अधिक कशी उंचावेल, यावरच अधिक भर देत आहेत. पुण्याबाहेरचे स्थळ आले तर ते या शहरापेक्षा अधिक चांगले असायला हवे, याला त्या प्राधान्य देतात. आर्थिक स्थैर्य आणि कुटुंब कसं आहे, याचा देखील विचार होतो. अरेंज मॅरेज करताना समाज, आसपासचे नातेवाईक काय विचार करतील, हे पाहिले जाते. समाजात ‘शेतकरी’ हा फार मानाचा मानला जात नाही. कुटुंब कुणाबरोबर जोडले जात आहे, हे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते. आपली जीवनशैली कमावली आहे, ती केवळ लग्नासाठी सोडणं तरुणींना मान्य नाही.
- तन्मय कानिटकर, अनुरूप विवाहसंस्था
------------------
तरुणींना वकील, प्राध्यापक, कंडक्टर, पौराेहित्यकार जोडीदार नको आहे. त्यांना प्रतिष्ठित क्षेत्रातील जोडीदार हवा आहे. जोडीदाराचा स्वतंत्र फ्लॅट हवा अशी त्यांची अट आहे. उद्या आमची नोकरी गेली तर किमान आर्थिक स्थैर्य देणारा नवरा हवाय. गावाकडच्या तरुणींना देखील पुण्यातीलच जोडीदार हवाय. काही तरुणींना एकत्र कुटुंबपद्धती हवी आहे. परंतु हे प्रमाण फक्त 20 टक्के इतकेच आहे.
- स्वाती महेंद्र संभूस, स्वाती वधूवर सूचक मंडळ
----------------------------