पुणे: गुजरातमधून येणारे बनावट बियाणे, त्याकडे राज्य सरकारचे होत असलेले दुर्लक्ष; तसेच खतांचे लिंकिंग व तुटवडा यामुळे शेतकरी अक्षरश: वाऱ्यावर आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी गुरुवारी (दि. २०) केला. खरीप हंगामासाठी अपेक्षित कर्जपुरवठा होत नसल्याचे सांगत राष्ट्रीयीकृत बँकांनी दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ २० टक्केच कर्जपुरवठा केल्याकडे लक्ष वेधत त्यांनी सहकार विभागाला धारेवर धरले.
दानवे यांनी पुण्यात सहकार आणि कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. सहकार आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विभागाचे आयुक्त रावसाहेब भागडे आदी बैठकीत उपस्थित होते. दानवे म्हणाले, ‘गुजरातमधून राज्यात कापसाचे बनावट बियाणे येत आहे. अशा बनावट बियाणांमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया जात आहे. त्यामुळे अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. विदर्भात पुन्हा आत्महत्या वाढू लागल्या आहेत; पण राज्य सरकारला याचे सोयरसुतक नाही. राज्य सरकार, कृषी विभागाचे अधिकारी आणि खासगी कंपन्यांचे संगनमत असल्यामुळे सर्वकाही बिनभोबाट सुरू आहे.’
निकृष्ट बियाणे, यंत्रे, खते, औषधे शेतकऱ्यांच्या माथी
राज्यात खतांचे लिंकिंग सुरू आहे. युरिया खतासाठी मिश्र किंवा संयुक्त खत घ्यावे लागते. त्यांना विनाउपयोगी जैविक खते घेण्याची सक्ती केली जात आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ जाणीवपूर्वक निष्कृष्ट दर्जाचे बियाणे, यंत्रे, औषधे, जैविक खते शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. राज्यातील सोयाबीन उत्पादक पट्ट्यात डीएपी खताचा मोठा तुटवडा आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट येऊ घातले आहे; पण कृषी विभागाला त्याचे देणे-घेणे नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीकाही दानवे यांनी केली.
पीकविम्यापासून हजाराे शेतकरी वंचित
शेतकऱ्यांना होणाऱ्या कर्जवाटपात अद्यापही सी-बिल गुण पाहिले जात आहेत. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेडनेट, हॉलिहाऊस, हरितगृह उभारलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. पीकविम्यापासून अजूनही हजारो शेतकरी वंचित आहेत. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत, असा आरोपही त्यांनी केला.