पुणे - महिना कोरडा गेल्याने फक्त ४.३७ टक्के झालेल्या खरीप हंगामाच्या पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्या २० टक्केंवर गेल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी या हंगामात सोयाबीन लागवडीला पसंती दिल्याचे दिसते. आतापर्यंत ३४८ टक्के लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या साप्ताहिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. जून महिन्यात ८१.३६ मिमी पाऊस झाल्याने पेरण्या रखडल्या होत्या. खरिपाच्या पेरण्या होतात की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ४.३७ टक्के इतक्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यात सर्वाधिक सोयाबीनच्या ३३.६, मुगाच्या ३२.४, मका १५.७, बाजरी १०.६, भात ४.८, ज्वारी २.९,उडीद ९३.०, भुईमूग ३.६ टक्केइतक्याच पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जुलै महिना पाऊस घेऊन आला. जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. पहिल्याच आठवड्यात १६५.११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत ३५ लाख ५१ हजार ५० हेक्टरपैैकी ७० हजार ११० हेक्टरवर म्हणजे २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ हजार ५०० हेक्टर अपेक्षित असताना ८ हजार ७०० हेक्टरवर म्हणजे ३४८ टक्के पेरणी झाली आहे. त्यानंतर उडीद ७२, मका ६४ व मूग ६१ टक्के पेरण्या झाल्या आहेत, तर सर्वात कमी खरीप ज्वारी व रागी ४ टक्के इतक्याच पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल
By admin | Published: July 09, 2016 3:46 AM