तुकडा पाडून एक गुंठा खरेदीखताची नोंद करण्याच्या मोहापायी मूळ मालकाचे नावच सातबारावरून गायब केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासाठी मूळ मालकाला आपले नाव पुनश्च सातबारावर घेण्यासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. हा प्रकार थेऊर येथील गट नंबर ९६० मध्ये घडला. यामध्ये तलाठी व मंडलाधिकाऱ्यांनी एकाच सातबारावर वेगवेगळे नियम दाखवत काही तुकडे पाडलेल्या गुंठ्याच्या नोंदी नामंजूर केल्या आहेत. याच गटातील काही तुकड्यांच्या नोंदी मंजूर करून महसूलमध्ये नवीन आर्थिक नियमाचा पायंडा पाडला आहे.
आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी वरिष्ठ कार्यालयातील एक नायब तहसीलदार हे तलाठी व मंडलाधिकारी यांंना काही तुकडाबंदीच्या नोंदी घेण्यासाठी फोनवरून सांगत असल्याने तलाठी व मंडलाधिकारीही पेचात सापडले आहेत. नोंदी न केल्यास दफ्तर तपासणीची टांगती तलवार वरिष्ठ कार्यालयांतून असल्याचे एका तलाठ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर माहिती सांगितली. हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी विशेष शिबिराद्वारे सातबारा दुरुस्ती, १५५ ची प्रकरणे, अहवाल एकमधील सातबारा तातडीने निर्गत करण्याच्या सूचना दिलेल्या असल्या तरीही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी दिसत नाही. याकामी खातेदार शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातील आरटीएस टेबलला चकरा माराव्या लागत असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
कोट
जिल्हाधिकारी व जमाबंदी कार्यालयाने तुकडाबंदीच्या नोंदी करू नयेत, असे परिपत्रक बजावले आहे. थेऊरमधील गट नंबर ९६० मधील खातेदारांची तक्रार आल्यास संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल. तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडून काही गुंठेवारीमधील बेकायदेशीर नोंदी केल्यास नागरिकांनी तक्रारी कराव्यात. थेऊरमधील गट नंबर ९६० मधील झालेल्या नोंदीच्या प्रकरणाची माहिती घेतली जाईल.
- संजय तेली, रजा राखीव उपजिल्हाधिकारी