पुणे : विमा कंपन्यांकडून राज्यात शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. या कंपन्यांच्या ५ वर्षांच्या कामकाजाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी कृषी आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या शेतकऱ्यांनी कृषी आयुक्त कार्यालयाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. कंपन्या व कृषी अधिकारी याचे साटेलोटे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.तूपकर म्हणाले, विमा कंपन्या लूट करत आहेत. त्यांनी ३५ हजार कोटींचा व्यवसाय केला. २५ हजार कोटी फायदा झाला.
काहीही कारणे सांगून विमा प्रस्ताव नाकारले जातात. या कंपन्यांच्या कामाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी आमची मागणी आहे. येत्या १५ दिवसात आमच्या मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा राज्यातील शेतकरी इथे घेऊन येऊ. त्यावेळचे आंदोलन सरकार हलवणारे असेल असा इशारा तुपकर यांनी दिला.