बारामती : डाळिंब बागायतदारांना लुबाडण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. राज्य शासनाने बाजार समित्यांमधील दलाली संपवल्याचा कितीही दावा केला असला तरी शेतक-यांच्या कष्टाच्या कमाईवर हात मारण्याचे प्रकार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये नित्याने घडून येत आहेत. याचा फटका बारामती, इंदापूर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांना बसला आहे.बारामती, इंदापूर तालुक्यांतील जिरायती-बागायत पट्ट्यात हक्काची फळबाग म्हणून डाळिंब बागांकडे पाहिले जाते. एका रात्रीत कोट्यधीश करणारे पीक म्हणूनही डाळिंबाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊ लागली होती. मात्र कष्टाने पिकविलेले फळ बाजार समितीमध्ये अक्षरश: दलालांच्या घशात घालावे लागत आहे. शेतकºयाने बाजार समितीच्या आवारात माल आणला, की दलाल चांगल्या गुणवत्तेच्या मालाच्या सहा प्रकारात वर्गवारी करतो. ही वर्गवारी शेतकºयांच्या खर्चाने केली जाते. तत्पूर्वी दलाल ट्रान्स्पोर्टच्या वाहनांमधील कॅरेटमधून स्वत:च्या कॅरेटमध्ये माल उतरवून घेतो. या उतरवणुकीचे भाडेदेखील शेतकºयांच्या माथी मारले जाते. तसेच दलाल स्वत:च्या कॅरेटचे भाडेदेखील शेतकºयांकडून हमाली, तोलाई, भराईमध्ये ही रक्कम वसूल केली जाते.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात डाळिंबाचे बाजार९५ रुपयांपर्यंत होते. मात्र अवघ्या २० दिवसांतच डाळिंबाचे बाजार सरासरी २० ते २४ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.चांगल्या गुणवत्तेच्या फळांची सहा प्रकारात वर्गवारी केली जाते. या वर्गवारीच्या प्रकारावरदेखील डाळिंब बागायतदारांनी शंका व्यक्त केली आहे. इतर बाजार समित्यांमध्ये मालाची फक्त तीन प्रकारांत वर्गवारी केली जाते. मग पुणे बाजार समितीमध्ये सहा प्रकारांत वर्गवारी का? असा सवालही शेतकºयांनी उपस्थित केला आहे. ही वर्गवारी नेमकी कोणत्या आधारावर केली जाते याची उत्तरे दलाल शेतकºयांना देत नाही. साधारण एका एकर डाळिंब बागेसाठी १ लाखाच्या आसपासखर्च येतो. महिन्याच्या सुरुवातीला असणारा दर आता जवळपास ७० ते ८० टक्क्यांनी उतरल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चदेखील निघेनासा झाला आहे.बाजार पाडण्यासाठी अजब कारणे...बाजार उतरण्याची अजब कारणे दलाल शेतकºयांना देत आहेत. मध्यंतरी धुराच्या ढगामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण खराब झाले होते. याचा फायदा घेत पुण्यातील दलाल, व्यापाºयांनी दिल्लीत जास्त धुके पडल्याने बाजार उतरले असल्याचे हास्यास्पद कारण दिले होते.मात्र बाजार समितीमध्ये येणारी संपूर्ण आवक व्यापारी मातीमोलकिमतीने खरेदी करीत होते. मात्र किरकोळ विक्रीचे बाजार मात्र अजूनही चढेच राहिले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे व्यापारी व दलाल बाजार पाडण्यासाठी फालतू कारणे देत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
डाळिंब बागायतदारांची दलालांकडून लुबाडणूक, बारामती, इंदापूरच्या शेतक-यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 1:05 AM