खेड : शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भीमा नदीचा बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चासकमान धरणातून डाव्या कालव्याला सोडलेल्या विशेष आवर्तनापासून हा परिसर वंचित राहिला आहे. परिणामी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतसिंचनाचा गहन प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा राहिला आहे. खेडच्या पूर्व भागातील बहुतांश गावे चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामात या परिसरातील शेतकरी विविध पिकांचे उत्पादन घेत असतो. चासकमानच्या डाव्या कालव्याला आवर्तन मिळाल्यानंतर परिसरातील पोटचाऱ्यामार्फत पाणी विविध ठिकाणच्या पाणी स्त्रोतांना वितरीत केले जाते. परंतु, या हंगामात कालव्याचे पाणी बंधाऱ्यात सोडले नसल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या या भागातील पोटपाट, विहिरी तसेच नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. शेलपिंपळगावच्या पश्चिमेला भीमा नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाण्यावर गावातील बहुतांशी शेती अवलंबून आहे. सध्या मात्र बंधाऱ्यात पाण्याचा साठा अजिबातच शिल्लक राहिला नाही. परिणामी बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून असलेले शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद पडले आहेत. चासकमान धरणातील पाणी वाटपाबाबत सरपंच सरपंच विद्या मोहिते, उपसरपंच सुमन मोहिते, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष काळूराम दौंडकर, माजी सरपंच सुभाष वाडेकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संजय मोहिते, संचालक सयाजीराजे मोहिते, माजी उपसरपंच शरदराव मोहिते, सोसायटीचे माजी अध्यक्ष शरदचंद्र गणपत मोहिते, अध्यक्ष नवनाथ मोहिते, सर्जेराव मोहिते, सोपान दौंडकर, पांडुरंग दौंडकर, मधुकर दौंडकर आदी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
खेडमध्ये पाण्याविना शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 15:54 IST
जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतसिंचनाचा गहन प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा राहिला आहे.
खेडमध्ये पाण्याविना शेतकरी हवालदिल
ठळक मुद्देभीमा नदी : चासकमान धरणातील पाण्यापासून वंचित; पिके अडचणीतपोटपाट, विहिरी तसेच नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे ठणठणीत